मुंबई - देशावर वारंवार दहशतवादी हल्ला करणा-या पाकिस्तानविरोधात गुरुवारी विधानसभेत संतप्त पडसाद उमटले. पाकिस्तानबराेबरचे संबंध तोडा, त्यांच्याशी क्रिकेटही खेळू नका. एवढेच नव्हे तर पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत चर्चाही करता कामा नये, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पंजाबमधील गुरुदासपुरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी शहीद झाले, अनेक नागरिक जखमी झाले. या हल्ल्याचा पवार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. १९९५ नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेकी असल्याने या देशासोबतच संबंध तोडा, त्यांच्याशी क्रिकेट खेळता कामा नये, असे पवार म्हणाले. पाकिस्तानकडून वारंवार अशाप्रकारची हल्ले होत असताना पंतप्रधान मात्र त्यांच्याशी चर्चा करत आहेत. यापुढे पाकड्यांशी चर्चाही करता कामा नये, असे आवाहनही पवार यांनी सभागृहात केले.