आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Need Of Another Fight For United Maharathtra

संयुक्त महाराष्ट्रासाठी दुसऱ्या लढ्याची तयारी, हुतात्म्यांना वंदन करून आज फुंकणार रणशिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - १७ जानेवारी १९५६ ...साठ वर्षांपूर्वी याच दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला सुरुवात झाली होती. मात्र, साठ वर्षांनंतर बेळगावसह सीमाभाग आजही राज्याबाहेरच आहे. म्हणूनच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील चार शहरे आणि तब्बल ८६५ मराठीबहुल खेडी जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र अपूर्णच आहे, अशी भूमिका घेत महाराष्ट्र एकीकरण समिती (मुंबई) आणि मराठी अभ्यास केंद्र या दोन संस्थांनी संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा सुरू केला आहे.

या लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या १०५ हुतात्म्यांना हुतात्मा चौकात वंदन करून या नव्या लढ्याची सुरुवात केली जाणार आहे. एकीकडे वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरत असतानाच साठ वर्षांपूर्वीचा हा प्रश्न नव्याने हाती घेत तो तडीस नेण्याचे मोठे आव्हान आयोजकांसमोर असेल. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर असो की भालकी या मराठी बहुल सीमावर्ती पट्ट्यातील जनता आजही महाराष्ट्रात येण्यास आतुर आहे. कानडी सरकारचे अत्याचार सोसत आजही ही जनता महाराष्ट्राच्या पाठिंब्याकडे डोळे लावून बसली आहे. त्यांच्या अपेक्षांना प्रतिसाद देत या लढ्याला महाराष्ट्रातील जनतेने अधिक बळ दिले पाहिजे, या भूमिकेतून मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढ्याचे रणशिंग फुंकण्यात आले.

मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने वर्षभरापूर्वी सीमावर्ती भागातील मराठीबहुल चार शहरे आणि ८६५ गावांचा अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात मराठी भाषकांशी प्रत्यक्ष संवाद साधून भावना जाणून घेण्यात आल्या. आजही हा मराठी भाषक समाज महाराष्ट्रात येण्याचे स्वप्न पाहतो आहे. म्हणूनच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या या दुसऱ्या लढ्याद्वारे राजकीय, सामाजिक आणि इतर व्यासपीठावरून ही भावना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस डॉ. पवार यांनी व्यक्त केला. आपल्या सीमावर्तीय बांधवांची ही भावना समजून घेऊन सर्वोच्च न्यायालयातही आपली बाजू अधिक जोरकसपणे मांडावी, असे आवाहन या निमित्ताने सरकारला करणार असल्याचेही ते म्हणाले.

हुतात्मा दिनाचे औचित्य...
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना रविवार, दि. १७ जानेवारी रोजी मुंबईतील हुतात्मा चौकात अभिवादन करून या लढ्याची सुरुवात केली जाणार आहे. १७ जानेवारी हा दिन सीमावर्ती भागात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो, तसा तो संपूर्ण महाराष्ट्रातही पाळला जावा, ही या मागची भूमिका आहे.
दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख