(छायाचित्र- पंकज पारख)
मुंबई- मनसेचे पुण्यातील दिवंगत आमदार रमेश वांजळे हे ख-या अर्थाने पहिले 'गोल्डमॅन' ठरले होते. वांजळेंचे छिप्पाड व्यक्तिमत्त्व व रूबाब यामुळे त्यांच्या अंगावर सोने शोभून दिसायचे. त्यामुळे त्यांना गोल्डमॅन ही उपाधी मिळाली. मात्र, वांजळेंची स्टाईल करीत हळूहळू एक-एक गोल्डमॅन होण्यासाठी धरपडू लागला. खरं तर वांजळे हे हौस म्हणून सोने घालायचे. हौसेला मोल नसते अशी एक
आपल्याकडे म्हण आहे. पण हौस पूर्ण करणा-याला त्याचे भान नसले की काय होते याचे उदाहरण म्हणजे नाशिकमधील राष्ट्रवादीचे नेते व येवला पालिकेचे उपनगराध्यक्ष पंकज पारख. या महाशयांनी चार महिन्यांपूर्वी आपल्या 45 व्या वाढदिवशी सोन्याचा शर्ट घालून आपली हौस भागवली आणि राज्यभर टीकेचे धनी बनले. त्याआधी मागील वर्षीही पुण्यातील राष्ट्रवादीचेच पदाधिकारी असलेल्या दत्ता फुगेंनी आपल्या संपत्तीचे ओंगाळवाणे प्रदर्शन करून हौस भागवली व आपल्यासह पक्षाची लाज चव्हाट्यावर आणली होती.
चार किलो सोने असलेला दीड कोटीचा खरेदी केला शर्ट- येवला पालिकेचे उपनगराध्यक्ष पंकज पारख यांनी आपला 45 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी खास सव्वा कोटी रुपये किंमतीचा सुमारे चार किलो सोन्याचा शर्ट बनवून घेतला. अंगावर सर्वाधिक सोने घालून नवा विक्रम आपल्या नावे करण्याची इच्छा पंकज यांची होती. मात्र, त्यांच्या या हौसेची वाहवा होण्यापेक्षा टीकाच जास्त झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते व नाशिकचे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पारख यांना खडे बोल सुनावत सोन्याचा शर्ट घातला तर मी वाढदिवसाला येणार नाही अशी तंबी दिली. भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते असलेले पंकज यांनी त्यांची अट मान्य केली. भुजबळांसमवेत त्यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापला अन् भुजबळ तेथून जाताच सोन्याचा शर्ट घालून पुन्हा कार्यकर्त्यांसमवेत वाढदिवस साजरा करीत आपला बडेजाव मिरवलाच. अशा वागण्यामुळे पंकज पारख यांच्यावर टीका झाली नसती तरच नवल...
पुढे पाहा व वाचा, गोल्डमॅन पंकज पारख व दत्ता फुगे यांनी केलेले संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन....