आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांचा जनाधार वाढवा, शरद पवार यांचे पदाधिका-यांना आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मायावतींचा जनाधार दलित समाज आहे तर मुलायमसिंहांचा यादव समाज, मात्र राष्ट्रवादीचा असा जनाधार नसल्याने महिलांचा जनाधार तयार करावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच नेत्यांनी पक्ष वाढवण्यासाठी जिल्ह्यांचा दौरा करावा, असे आदेशही त्यांनी दिले.
शरद पवार यांनी म्हटले की, नवी मुंबईतील कार्यक्रमात मुस्लिमांना स्थान देऊन सामाजिक आशयाचा आग्रह मी धरला होता. नुकत्याच झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीत आपण सहा मुस्लिम कार्यकर्त्यांना स्थान दिले यापैकी पाच महिला आहेत. तसेच विविध निवडणुकांमध्ये 104 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. याबाबत मी आपणा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करतो.
पक्षाच्या वर्धापन दिनी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात येत असून जास्तीत जास्त महिलांना सदस्य करून घ्यावे असे सांगून शरद पवार म्हणाले की, महिला मतांचे परिवर्तन करू शकतात त्यामुळे आपण महिला कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले पाहिजे.
पक्ष वाढीसाठी आपण स्वत: आणखी प्रयत्न करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये मी गेलो नाही त्या जिल्ह्यांमध्ये मी दौरा करणार आहे. पुढील महिन्यात मी चंद्रपूर वा गोंदिया जिल्हयाचा दौरा करीन. नेत्यांनी आणि मंत्र्यांनी पुढील 15 दिवसात असे दौरे आयोजित करावेत असेही त्यांनी सांगितले.
नवीन चेह-यांना संधी मिळावी
आता आमचे वय झाले आहे, नवीन पिढी समोर आली पाहिजे. नव्या चेह-यांना स्थान दिल्यास पक्षात नवचैतन्य येईल आणि पुढील पाच-दहा वर्षात पक्षाचा चेहरा बदलल्याचे दिसेल असेही शरद पवार यांनी सांगितले.