आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना पुस्तकांऐवजी थेट खात्यात पैसे, राष्ट्रीयीकृत बँकेत ‘झीरो बॅलन्स’ खाती उघडण्याचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत पुस्तकांऐवजी आता त्यासाठीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीयीकृत बँकेत ‘झीरो बॅलन्स’ने खाती उघडण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक आणि शिक्षण सचिव नंदकुमार यांनी बुधवारी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. 

शासनाने ५ डिसेंबरला हे आदेश काढले. बँक खात्याला आधार क्रमांक जोडण्यासही सांगण्यात आले आहे. राज्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र, ही लाभाची वस्तू असल्याने यापुढे थेट पुस्तके देता येणार नाहीत. शासन आदेशानुसार रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यांवर जमा करावी लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. खाते न उघडल्यामुळे एखादा विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सगळी जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर असेल.
 
‘बालभारती’वर टाच  
शाळांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा बालभारती करते. यात दरवर्षी सुमारे २५० कोटींहून अधिक खर्च पुस्तकांवर केला जातो. मात्र आता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या नव्या धोरणामुळे राज्यातील बालभारतीचेही अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली.