आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळग्रस्त परिसरातील विद्यार्थ्यांची फी माफ करणार : एकनाथ खडसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळग्रस्त भागातील १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असून ज्यांची मुले वैद्यकीय आणि उच्च व तंत्र शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांचीही ५० टक्के फी माफ करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

खडसे म्हणाले, आणेवारी अचूक निश्चित करण्यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून अचूक आर्द्रता मोजणे, जमिनीतील पाण्याची पातळीचा अंदाज काढणे इत्यादी शिफारशी समितीने अहवालात केल्या आहेत. मात्र, या अहवालावर प्रदीर्घ चर्चा करण्याची गरज असल्याने माझ्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये चर्चा करून समिती १५ दिवसांत अहवाल ठेवेल.
बीड उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातील तर सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, जालना, अहमदनगर, परभणी या जिल्ह्यातील ६९ तालुक्यांमध्ये टंचाई परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जे जे उपाय करायचे असतात, ते तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आणेवारी जाहीर होण्याची वाट न पाहता टंचाई असलेल्या भागात मागणी केलेल्या ठिकाणी चारा, पाणी व रोजगार देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी निकष शिथिल करण्यात येणार आहेत, असेही खडसे यांनी या वेळी सांगितले.
आदिवासींच्या जमीन विक्रीबाबत विचार
राज्यातील आदिवासींना त्यांच्या मालकीची जमीन विकण्यासंदर्भात सुरू असलेल्या वादाबाबत विचारता खडसे म्हणाले, जमिनी विकण्याचा अधिकार हा घटनादत्त अधिकार आहे. या मागणीसाठी आदिवासीच उच्च व सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन्ही न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला असतानाही आदिवासींच्या अज्ञानाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून राज्य शासनाने आदिवासींना जमिनी विकण्यास परवानगी दिली नाही. आदिवासींच्या जमीन विक्रीसंदर्भात संधू समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातील शिफारशींवर शासन पातळीवर विचार सुरू आहे.
राज्यात सरासरीच्या ५५ टक्के पाऊस
गेल्या काही दिवसांत राज्यात वातावरण अंशत: ढगाळ होते. तसेच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. राज्यात आजपर्यंत ५३८.७ मि.मी. पाऊस झाला असून तो ९७६.४ मि.मी. या सरासरीच्या ५५.२ टक्के आहे. राज्यातील सर्व जल प्रकल्पांत ४९ टक्के एवढा साठा असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. राज्यात सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली या १८ जिल्ह्यांमध्ये ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, यवतमाळ या दहा जिल्ह्यांत २६ ते ५० टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी सहा तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत ० ते २५ टक्के, ११९ तालुक्यांत २६ ते ५० टक्के, १४३ तालुक्यांत ५१ ते ७५ टक्के, ६८तालुक्यांत ७६ ते १०० टक्के आणि १९ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.