आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एफआरपी’ न देणाऱ्या ५६ कारखान्यांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गाळप हंगामात उसाला रास्त भाव (एफअारपी) न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार राज्यातील सुमारे ५६ साखर कारखान्यांवर सहकार विभागाने कारवाई केली अाहे. यापैकी आठ कारखान्यांचा गाळप परवाना निलंबित करण्यात आला असून सहा साखर कारखान्यांना दंड ठाेठावण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

केवळ याच गाळप हंगामात एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात अालेली नाही, तर सन २०१४-१५ वर्षीच्या हंगामातही एफअारपी न देणाऱ्या २० साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात अाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. २१ हजार कोटी रुपयांच्या एफआरपीपैकी १९२ कोटी रुपये या कारखान्यांनी थकवले होते. या २० साखर कारखान्यांसह यंदाच्या गाळप हंगामात एफआरपी न देणाऱ्या ३६ कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र यापैकी आठ कारखान्यांनी आठ दिवसांत एफआरपी देण्याचे मान्य केल्याने त्यांना कारवाईतून सूट देण्यात अाली अाहे. ज्या कारखान्यांनी फक्त १३ ते १५ टक्केच एफआरपी दिली त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. साखरेचे दर अगोदरच वाढलेले आहेत त्यामुळे कारखान्यांनी एफआरपीची रक्कम देण्यास चालढकल करणे योग्य नाही. अशा कारखान्यांवर आणखी कठोर कारवाई आम्ही करणार आहोत, असेही सहकारमंत्र्यांनी सांगितले.

साठेबाजांना इशारा
साखरेचे दर आणखी वाढतील आणि फायदा कमवता येईल म्हणून काही जणांनी साखरेचे साठे करून ठेवलेले आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्याचा विचार आहे. उद्या केंद्राने साखरेचे दर लक्षात घेऊन साठेबाजांवर नियंत्रण आणण्याचा कायदा केला तर साठेबाजी करणाऱ्या सर्व साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई होऊ शकते, असेही सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गाळप परवाने निलंबित केलेले कारखाने
समर्थ, सागर- जालना
महाकाली- सांगली
श्रीराम, फलटण-जवाहर, न्यू फलटण- सातारा
राजगड-पुणे
महाराष्ट्र शेतकरी- परभणी
वसंत-पुसद- यवतमाळ

२०१५-१६ पूर्वी परवाने रद्द केलेले कारखाने
आदिनाथ, श्री कूर्मदास, शिवरत्न करंकब- सोलापूर
चोपडा- जळगाव
वसंतदादा शेतकरी- सांगली
छत्रपती- पुणे

थकीत एफआरपीमुळे बंद कारखाने (२०१५-१६ मधील)
आदिनाथ, कूर्मदास, विजय शुगर्स (खासगी)- सोलापूर
चोपडा- जळगाव
वसंतदादा- सांगली
बातम्या आणखी आहेत...