आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुभाष घईंना मिळाली ‘कांची’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'युवराज' या सिनेमानंतर प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी ‘कांची’ या सिनेमाची घोषणा गेल्या वर्षी केली होती. या सिनेमातील अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांनी नव्या चेह-या चा शोध सुरू केला होता. तो आता संपला आहे. ‘कांची’ मधील मुख्य भूमिकेसाठी कोलकात्याच्या मिस्टी या तरुण अभिनेत्रीची निवड केल्याची माहिती सुभाष घई यांनी खास ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

घई यांनी सांगितले की, माझ्या वाढदिवसाची भेट मला मिळाली आहे. 24 जानेवारी रोजी माझा वाढदिवस असतो आणि ‘कांची’साठी नायिकेची निवड करून मी माझा वाढदिवस साजरा करत आहे. ‘कांची’ सिनेमासाठी नव्या चेह-याची आवश्यकता होती. या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा होता. तो चेहरा मिळावा म्हणून आम्ही देशभर ऑडिशन घेतल्या होत्या. सुमारे 350 मुलींची आम्ही ऑडिशन घेतली. सर्व मॉडेल या सुंदर होत्या; परंतु ‘कांची’च्या भूमिकेला न्याय देईल असा चेहरा मला मिळत नव्हता. मात्र, मिस्टीचा फोटो जेव्हा मी पहिल्यांदाच पाहिला तेव्हा माझी कांची हीच असा मला विश्वास वाटला आणि आम्ही मिस्टीची ऑडिशन घेतली. ऑडिशनमध्ये तिने कांचीच्या भूमिकेला न्याय दिला.

कांचीची निवड तर झाली; परंतु आता नायकाच्या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि ऋषी कपूर महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत.