आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Submarine INS Sindhuratna Mishap Navy Boss DK Joshi Quits Over Accident

भारतीय नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय नौदलातील आयएनएस सिंधुरत्न पाणबुडी बुधवारी मुंबई किनार्‍यालगत समुद्रात 80 कि.मी. अंतरावर स्फोट झाल्याने दुर्घटनाग्रस्त झाली. पाणबुडीवरील नौसेनेच्या दोन अधिकार्‍यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, नौदलाने त्यास दुजोरा दिलेला नाही. याशिवाय सात जण बेशुद्ध झाले आहेत. घटनेनंतर 12 तासांनी नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल डी.के. जोशी यांनी राजीनामा दिला आहे. व्हाइस अ‍ॅडमिरल आर.के. धोवन यांच्याकडे दलाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

मागील सात महिन्यांतील नौदलातील हा 10 वा अपघात आहे. सरकारने अँडमिरल जोशी यांचा राजीनामाही मंजूर केला आहे. कोर्ट ऑफ इन्क्वायरी नेमण्यात आली आहे. आयएनएस सिंधुरत्नची चाचणी सुरू असताना पहाटे साडेसहा वाजता ही दुर्घटना झाली. तेव्हा बॅटरी कक्षात स्फोट झाला. त्यामुळे पाणबुडीची अग्निरोधक यंत्रणा सक्रिय होऊन फ्रियॉन गॅसची गळती झाली. आगीमुळे नौकेवरील कक्ष क्रमांक 3 लॉक झाले. याच कक्षात लेफ्टनंट मनोरंजन कुमार आणि लेफ्टनंट कमांडर कपीश मुवाल हाते. दोघांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. धुरामुळे सात नौसैनिक बेशुद्ध झाले. त्यांना अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

4 डिसेंबर 2013 नौदलदिनी बोलताना
नौदलात दुर्घटनांचे वाईट रेकॉर्ड नाही. जगाच्या तुलनेत आमचे नौदल चांगले आहे. सशस्त्र दलांच्या व्यवहारात ऑपरेशनल रिस्क तर असतेच.

26 फेब्रुवारी 2014 राजीनामापत्रात
मागील दुर्घटनांची नैतिक जबाबदारी घेतो. यामुळे नौदलाच्या प्रतिमेला धक्का बसला. सरकारने विश्वास टाकला, पण मी राजीनामा देत आहे.

दुरुस्तीनंतर चाचणी
रशियात निर्मित सिंधुरत्न 1988 मध्ये नौदलात सामील. 2003 मध्ये दुरुस्तीसाठी सहा महिने ती डॉकयार्डमध्ये होती. बुधवारी चाचणीसाठी गेली.

निवृत्तीच्या 15 महिने आधीच पायउतार
अँडमिरल जोशींचा 15 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक होता. दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारे ते पहिले नौदलप्रमुख आहेत.

दुर्घटनांची ‘साडेसाती’
- 26 फेब्रुवारी 2014 : सिंधुरत्न स्फोट
- 3 फेब्रु. : आयएनएस ऐरावत दुर्घटना
- 22 जाने. : आयएनएस बेटवा धडकली.
- जानेवारी : आयएनएस तलवारला अपघात.
- 17 जानेवारी : सिंधुघोष मुंबई हार्बरवर रुतली.
- जानेवारी : आयएनएस विपुलच्या पिलरला तडे.
- 23 डिसेंबर 2013 : आयएनएस कोकणला आग.
- सप्टेंबर : मुंबईजवळ आयएनएस विराटमध्ये आग.
- 14 ऑगस्ट : सिंधुरक्षक स्फोटात 18 जणांचा मृत्यू.