आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mandir By Next Year’s Ram Navami: Subramanian Swamy

पुढील रामनवमी अयोध्येच्या भव्य रामंदिरात साजरी करू : सुब्रमण्यम स्वामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘येत्या जुलै किंवा सप्टेंबरपर्यंत अयोध्येच्या राममंदिराचा विषय न्यायालयात संपवून टाकू आणि पुढील रामनवमी अयोध्येच्या भव्य राममंदिरात साजरी करू,’ असे वक्तव्य भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी केले. त्यांचे हे वक्तव्य वादात सापडण्याची शक्यता आहे. मुंबईतील दादर येथे विराट हिंदुस्थान संगम या संस्थेच्या वतीने "अयोध्येत श्रीराम मंदिर का आणि कसे?' या विषयावर स्वामींचे व्याख्यान आयोजित केले होते. आपल्या भाषणात त्यांनी हिंदूंची एकता होऊ नये म्हणून असहिष्णुता आणि जातीयतेच्या नावाखाली वाद पेटवले जात असल्याचाही आरोप केला.

‘अयोध्येतील राममंदिर जमिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात असून केसचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागेल,’ अशी आशा व्यक्त करत या प्रकरणाची दररोज सुनावणी घेऊन निर्णय व्हावा, असे मतही स्वामी यांनी व्यक्त केले. आपण अनेक मुस्लिम नेत्यांशी चर्चा केली. मात्र, अगोदर न्यायालयाचा निर्णय येऊ द्या, मग त्यावर भूमिका व्यक्त करू, असे हे नेते म्हणतात, असेही स्वामी म्हणाले. या परिसरात मुस्लिम समाजाला फक्त नमाज पढण्यासाठी जागा दिली होती. तिथे कालांतराने बाबरी मशीद बांधली गेली. अयोध्येत नदीच्या अलीकडची जागा राममंदिरासाठी आहे. त्यामुळे मशीद बांधायची असेल तर नदीच्या पैलतीरावर बांधावी, असेही ते म्हणाले. शेकडो वर्षे ख्रिस्ती आणि मुस्लिम साम्राज्याचा भाग असूनही हा देश हिंदू राष्ट्रच राहिल्याचे सांगत स्वामींनी हिंदू समाजाच्या एकजुटीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जे मुस्लिम सोबत येतील त्यांची साथ जरूर घेतली जाईल, असे सांगत ते म्हणाले, इथला मुस्लिम हा आधी हिंदूच होता, असा दावाही स्वामींनी केला.
हिंदुत्ववाद्यांकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर?
गुढीपाडव्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत राममंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली होती. त्या टीकेनंतर आठवडाभरातच मुंबईत राममंदिराच्या मुद्द्यावर या व्याख्यानाचे आयोजन करून आपण अजूनही राममंदिराचा मुद्दा सोडलेला नाही, असाच संदेश जणू हिंदुत्ववाद्यांनी दिल्याची चर्चा या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू होती. विशेष म्हणजे आपल्या भाषणात राज ठाकरेंनी काळा पैसा भारतात आणण्याच्या अाश्वासनावरूनही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली होती. तर आजच्या आपल्या भाषणात स्वामींनी काळ्या पैशावरूनही भाष्य केले. ‘परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याच्या आश्वासनाबाबतही आम्ही गंभीर आहोत. अजून सरकारची तीन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे या कालावधीत काळे धन आम्ही नक्कीच परत आणू,’ असा विश्वासही स्वामी यांनी व्यक्त केला.