आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वामींना ‘ईशान्य मुंबई’त रस; किरीट सोमय्या अस्वस्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जनता दल भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे ईशान्य मुंबई मतदारसंघाची विचारणा केली आहे. त्यामुळे गेल्या वेळी या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप नेते किरीट सोमय्या अस्वस्थ झाले आहेत. स्वामी यांनी 1977 आणि 1980 मध्ये येथूनच निवडणूक लढवली होती व एकदा ते निवडूनही आले होते.

स्वामी यांनी रविवारी आपला पक्ष भाजपात विलीन केला. त्यानंतर त्यांनी सुरक्षित मतदारसंघांची चाचपणी सुरू केली. पश्चिम दिल्ली, ईशान्य मुंबई आणि तामिळनाडूतील एका मतदारसंघाबद्दल त्यांनी भाजप नेत्यांकडे विचारणा केल्याचे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. मात्र मुंबईतून त्यांनी याआधीही दोन वेळा निवडणूक लढवली असल्यामुळे भाजपचे पक्षर्शेष्ठीही त्यांना ईशान्य मुंबईत संधी देण्याचा विचार करू शकतील, असे या नेत्याने सांगितले.

पूनम महाजनही इच्छुक
सोमय्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून गतवेळी निवडणूक हरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र सोमय्याही याच मतदारसंघासाठी आग्रही आहेत, तसेच दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम यांनाही इथूनच रस असल्याची चर्चा आहे. या स्पर्धेत आता स्वामींनी उडी घेतली आहे.

‘मातोश्री’वर माफी
मागील निवडणूक हरल्यानंतर सोमय्या यांनी आघाडी सरकार, मंत्री यांचे घोटाळे काढण्याचा सपाटा पाच वर्षे सुरू ठेवला. पण एकाही घोटाळ्याला ते शेवटपर्यंत सिद्ध करू शकले नाहीत. परिणामी त्यांचे आरोप आणि घोटाळ्यांच्या कथा कोणीच गांभीर्याने घेईनासे झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचे नाव पुढे आले होते. त्यामुळे शेवटी सोमय्या यांना चुपचाप ‘मातोश्री’वर माफी मागावी लागली आणि या घोटाळ्यावर पडदा टाकावा लागला.

‘उत्तर’मध्येही चाचपणी
सोमय्या यांचे आरोप ही पक्षासाठी एक डोकेदुखी ठरली आहे. भाजपच्या केंद्रीय टीममधूनही त्यांना मध्यंतरी डच्चू देण्यात आला होता. त्यातच आता स्वामींनी ही जागा लढवण्याचा मानस व्यक्त केला आणि भाजपने तसे ऐकले तर आपण जाणार कुठे, या प्रश्नाने सोमय्या हैराण आहेत. उत्तर मुंबईत आपल्याला निवडणूक लढवता येईल का, अशी चाचपणीही त्यांनी सुरू केल्याचे समजते. गेल्या वेळी येथून माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी निवडणूक लढवली होती. ते हा मतदारसंघ सोडण्यास तयार नसून उद्या ते दिल्लीत पक्षश्रेष्ठींना जाऊन भेटणार असल्याचे समजते.