आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subramanyam Swami Contesting Lok Sabha Election From Tamil Nadu

सुब्रमण्यम स्वामी आता तामिळनाडूतून लढणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठ संसदपटू सुब्रमण्यम स्वामी यांना ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून भाजप जागा देणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ही जागा किरीट सोमय्या किंवा पूनम महाजन यांच्यापैकी एकाला देण्याचे निश्चित झाले आहे. स्वामी यांना तामिळनाडूमधून उमेदवारी मिळणार असून यासाठी मुख्यमंत्री जयललिता यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपच्या राज्यस्तरीय निवडणूक समितीची बैठक प्रदेश कार्यालयात शुक्रवारी झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे हे ज्येष्ठ नेते उपस्थित नसल्यामुळे उमेदवारांबाबत अंतिम निर्णय झाला नाही.
गेल्या बैठकीत दहा उमेदवारांची यादी निश्चित करून ती दिल्लीला पाठवण्यात आली होती. शुक्रवारी मुंबईतील तीन, ठाणे व पुण्यातील प्रत्येकी दोन, धुळे, नंदूरबार, सोलापूर इत्यादी मतदारसंघांच्या अहवालावर चर्चा झाली. विनोद तावडेंकडे उत्तर महाराष्‍ट्र, एकनाथ खडसेंवर पश्चिम महाराष्‍ट्र, तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मतदारसंघांत जाऊन अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या पंधरा मतदारसंघांतील उमेदवार निश्चित करून पुन्हा एकदा ही यादी मंजुरीसाठी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.
मित्रपक्षांसाठी चार जागा
शिवसेना व भाजपसह महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं व राष्‍ट्रीय समाज पक्ष यांचा समावेश आहे. या पक्षांसाठी चार जागा शिवसेना व भाजपने सोडण्याचे ठरवले आहे. राजू शेट्टी हे विद्यमान खासदार असल्यामुळे ही जागा सोडून मित्रपक्षांना चार मतदारसंघात जागा द्याव्या लागतील.
शिवसेनेच्या दक्षिण मुंबईतून मंगलप्रसाद लोढांचे नाव
दक्षिण मुंबईतून आमदार मंगलप्रसाद लोढा यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी चर्चा बैठकीत झाली. सध्या ही जागा शिवसेनेकडे असून गेल्या वेळी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या मोहन रावले यांचा पराभव केला होता. या वेळी अरविंद सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. सावंत यांना उमेदवारी दिल्यास देवरांचा विजय निश्चित होईल. त्यापेक्षा लोढांना जागा दिल्यास देवरांसमोर ते आव्हान उभे करतील, अशी चर्चा झाली. मात्र या जागेवरून भाजप शिवसेनेला दुखवण्यास तयार नाही. दक्षिण मुंबईऐवजी आपल्या वाट्यातील ठाण्यातील एक जागा शिवसेनेसाठी सोडण्याची भाजपची तयारी आहे.