आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी साखर उद्योग गाळात घातला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यामुळे राज्यातील साखर उद्योग गाळात गेला. पवारांच्या चुकीच्या आयात धोरणामुळे साखरेचे भाव गडगडले. परिणामी ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह कारखानदार, ऊसतोडणी कामगारांना मोठा फटका बसला आहे, असा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते व खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केला. मात्र, भाजप याविरोधात शांत बसणार नसून सोमवार, 9 डिसेंबर रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे आणि यामध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरीही रस्त्यावर उतरून शरद पवार तसेच केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार करतील, अशीही घोषणा मुंडे यांनी केली.
भाजप प्रदेश कार्यालयात प्रसार माध्यमांशी शनिवारी संवाद साधताना मुंडे यांनी पवारांच्या चुकीच्या साखर धोरणाचा पंचनामा केला. 7200 कोटींचे पॅकेज देऊन पवार साखर कारखाने वाचवण्यासाठी आपण असे उदार झालो आहोत, हे दाखवत असले तरी त्यांनीच गेल्या वर्षी कच्च्या साखर आयातील परवानगी दिल्यानेच 30 लाख टन साखर पडून राहिली आणि साखरेचे भाव प्रचंड कोसळले. परिणामी बाजारात भावच नसल्याने मोठा तोटा कारखान्यांना सहन करावा लागला. याचबरोबर खरेदी करही रद्द झाला नाही. यामुळेच आजमितीला राज्यात तब्बल 68 साखर कारखाने विक्रीला निघाले आहेत, असे मुंडे म्हणाले.