आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील साखर कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात पंधरा टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात अाला. या निर्णयाचा लाभ दीड लाख कर्मचाऱ्यांना होणार असून हा नवा करार जुलै २०१५ पासून लागू होणार आहे.

राज्यातील साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा वेतन करार दर पाच वर्षांनी होतो. जुना वेतन करार एप्रिल २०१४ मध्येच संपला होता. अाता नवीन करारात वाढीव वेतन मिळावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केली जात हाेती. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नवा करार करण्यासाठी जुलै २०१५ मध्ये शिवाजीराव गिरीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. वेतनवाढीसंदर्भात अनेकदा बैठका घेण्यात आल्या, परंतु नव्या वेतन कराराचा पेच सुटत नव्हता. अखेर हे प्रकरण शरद पवार यांच्याकडे गेले. त्यानुसार बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे विशेष बैठक घेण्यात आली. राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, श्रीराम शेट्ये, आमदार बबनदादा शिंदे, तात्यासाहेब काळे, अविनाशकाका आपटे, राहुल पाटील, शंकरराव भोसले आदी या वेळी उपस्थित होते.

या बैठकीत साखर कर्मचाऱ्यांच्या वेतनात पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या कराराची त्रिपक्षीय समिती नियुक्त झाल्यापासून म्हणजेच जुलै २०१५ पासून अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. नवा वेतन करार एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१९ पर्यंत असा पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...