आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड कामगारांच्या मजुरीत २०% वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऊसतोड कामगारांच्या मजुरीत २० टक्के अंतरिम वाढ करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली आहे. दरम्यान, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या घोषणेचे स्वागत केले असून यापुढील काळात ऊसतोड कामगारांना आणखी सवलती आणि जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय साखर उद्योगाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विविध घोषणांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.
मुंडे म्हणाल्या की, ऊसतोड कामगार हा समाजातील अत्यंत वंचित वर्ग आहे. त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी आपले गाव आणि घरदार सोडून ऊसतोडीसाठी इतर भागात जावे लागते. पण त्यांच्या मेहनतीच्या तुलनेत कारखान्यांकडून त्यांना पुरेसा मोबदला दिला जात नाही. दुसरीकडे यंत्रामार्फत केल्या जाणार्‍या ऊसतोडीला जादा भाव दिला जातो. ही तफावत दूर करून ऊसतोड कामगारांना मजुरीत वाढ मिळण्यासाठी आपण सत्तेत आल्यापासून प्रयत्न करत होतो. यासाठी मुख्यमंत्री, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत ऊसतोड कामगार संघटनांच्या बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांना यश मिळाले असून आता ऊसतोड कामगारांच्या मजुरीत २० टक्के अंतरिम वाढ करण्याचा निर्णय झाला आहे.

उसाच्या दराचे संकट कमी करणार
उसाचे वाढलेले भाव तर साखरेचे कमी झालेले दर यामुळे साखर कारखान्यांचा तोटा भरून काढण्यासाठी साखर निर्यातीवर अनुदान देण्यासाठी केंद्राकडे प्रयत्न करत आहे. साखर उद्योगाला दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. यामुळे ऊसदराचे संकट कमी होईल, असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.