आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्याची परिसीमा: पैठणच्या शेतकऱ्यासह तिघांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- समस्यांनी ग्रासल्यामुळे हताश आणि निराश झालेल्या जनतेला फडणवीस सरकार फारसा दिला देऊ शकले नाही, याचे निदर्शक ठरणाऱ्या तीन घटना मंगळवारी, मंत्रिमंडळ बैठकीच्याच दिवशी मंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयात घडल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केल्याच्या सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्री निश्चित भेटत असल्याने राज्यभरातून नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. आपले काम होईल अशी अपेक्षा त्यांची असते. परंतु राज्य सरकारकडून मदत मिळत नसल्याने नैराश्यातून मंगळवारी मंत्रालयातच दुपारी एका तासातच तीन जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जळगावमधील एका तरुणानेही राज्य सरकारकडून मदत मिळत नसल्याने आत्महत्या करण्याची धमकी मंत्रालयात येऊन दिल्याने खळबळ माजली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाला सेंट जॉर्ज इस्पितळात तर एकाला जेजे इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकाराने सरकार हादरले आहे.

दोघांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू; एकाचे मन वळवण्यात पोलिसांना आले यश

घटना १ : खरिपाला मदत नाही, पोलिसांवरही राग
पैठणचे शेतकरी दिलीप मोरे हलाखीच्या स्थितीमुळे बियाणे खरेदीसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून मंत्रालयात आले होते. आधी त्यांनी मदत मिळावी म्हणून सरकारदरबारीे प्रयत्न केलेे. परंतु यश न आल्यानेे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते. मात्र मुख्यमंत्री भेट देत नाहीत व मदतीची शक्यताही दिसत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर विषारी औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तातडीने जेजे इस्पितळात दाखल केले. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात अापल्या भावाचा जमिनीच्या वादातून खून झाला हाेता, मात्र पाेलिसांनी अात्महत्या केल्याचे दाखवून हे प्रकरण दाबले. त्या पाेलिसांवर कारवाईची मागणी करूनही त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्यामुळे व अार्थिक हलाखीमुळे अापण हे टाेकाचे पाऊल उचलल्याचे मोरेंनी सांगितल्याची माहितीही पाेलिसांनी दिली.

घटना २ : शिष्यवृत्ती मिळेना म्हणून नैराश्य
जळगाव येथील हिरालाल ढाकणे या तरुणाने शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नसल्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येची धमकी दिली. पोलिसांनी त्याला तातडीने तळमजल्यावरील पोलिसांच्या कार्यालयात नेले व चौकशी केली. पोलिसांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त करीत सामाजिक न्याय विभागात नेऊन संबंधित व्यक्तीशी भेट घालून दिली व त्याचे काम होईल असे आश्वासन दिले.

घटना ३ : मुख्यमंत्र्यांना भेटता येत नाही म्हणून
मुंबईतील मुलुंड येथे राहाणाऱ्या दिलीप पडाया या व्यक्तीनेही मोरे प्रकरणानंतर तासाभरातच सहाव्या मजल्यावरच गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. भेटीसाठी अनेकदा प्रयत्न करूनही मुख्यमंत्री भेट देत नसल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत दिलीप पडाया यांना खाली आणले आणि सेंट जॉर्ज इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.

उंदराचे अाैषध खाण्याचा प्रयत्न
दिलीप मोरे यांनी उंदीर मारण्याचे अाैषध खाण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र त्यांना वेळीच राेखल्याने ते अाैषध खाऊ शकले नाहीत. तरी खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात सर्वसाधारण वाॅर्डमध्ये ठेवले आहे. त्यांच्या प्रकृतीला धाेका नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
मंत्रालयात एकाच दिवशी एका शेतकऱ्यासह आत्महत्येच्या प्रयत्नांचे तीन प्रकार घडल्यामुळे सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे. या तिन्ही घटनांच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. यापुढे मंत्रालयात भेटीसाठी येणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

यापूर्वी नांदेडच्या शेतकऱ्याने केली होती आत्महत्या
यापूर्वी नांदेडच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोरच आत्महत्या केली होती. दुष्काळ आणि कर्जबारीपणामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याला सरकारकडून मदतीचा कोणताही हात मिळाला नव्हता. कर्जबाजारीपणामुळे आलेल्या वैफल्यातून या वर्षी मराठवाड्यातील तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...