आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक: विराटचे शरसंधान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सप्टेंबर महिन्यात एका मुलाखतीत महान गोलंदाज कपिल देव यांनी बीसीसीआयच्या अतिव्यग्र वेळापत्रकावर एक अत्यंत उपहासात्मक टीका केली होती. ते म्हणाले होते की, ‘बीसीसीआय पैशाने गब्बर झाली असल्याने त्यांची भारतीय क्रिकेटपटूंना जर जास्तीत जास्त सामने खेळवायची इच्छा असेल तर त्यांनी स्वत:चे एक विमान खरेदी करावे. त्यामुळे खेळाडूंचा वेळ वाचेल, त्यांचं जगणं सुसह्य होईल.’ कपिल देव यांनी या मुलाखतीत खेळाडूंनीही विमाने खरेदी करण्यास काही हरकत नसल्याचा मुद्दा मांडला होता. अमेरिकेत गोल्फ खेळाडू आपली स्वत:ची विमाने वापरतात तशी विमाने भारतीय क्रिकेटपटूंनी वापरण्यास सुरुवात केली तर त्यांच्यावरचा ताण कमी होईल, असे ते तिरकस बोलले होते. 


कपिल देव ज्या सप्टेंबर महिन्यात बोलले त्या वेळी श्रीलंकेसोबतची मालिका आटोपली होती व १० दिवसांनंतर ऑस्ट्रेलियासोबत मालिका होणार होती. त्यानंतर न्यूझीलंडसोबत मालिका झाली व आता श्रीलंकेसोबतची मालिका सुरू झाली आहे. ही मालिका २४ डिसेंबरला संपेल व २७ डिसेंबरला भारतीय संघ द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, सहा वनडे व तीन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंडियन प्रीमियर लीग झाल्यानंतर भारतीय संघ १७ दिवसांच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर २१ जुलै ते ६ सप्टेंबरदरम्यान तो श्रीलंका दौऱ्यावर होता. हा दौरा आटोपल्यानंतर केवळ पाच दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात एक महिन्यासाठी आला. हे वेळापत्रक किती व्यग्र होते हे लक्षात येते. त्यामागची कारणे बीसीसीआयकडे नाहीत. म्हणून गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा पारा चढला व त्याने बीसीसीआयच्या ढिसाळ नियोजनावर त्यांनाच सुनावले. ‘द. आफ्रिकेत मालिका खेळण्यासाठी जी तयारी भारतीय खेळाडूंना अत्यावश्यक आहे तिच्यासाठी बीसीसीआयने पुरेसा वेळच दिलेला नाही. 


अशा परिस्थितीत खेळाडूंपुढे तंदुरुस्त राहण्याचे मोठे आव्हान आहे. एका मालिकेपाठोपाठ दुसरी मालिका खेळणे कठीण असते. कसोटी मालिकेनंतर खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा होते. टीका होते, पण या खेळाडूंना तयारीसाठी किती कमी वेळ दिला जातो यावर कोणी बोलत नाही.’ असे कोहली म्हणाला. भारताच्या क्रिकेट कर्णधाराने असे थेट शरसंधान साधल्यामुळे लक्षात येण्यास हरकत नाही की, हा संघ किती ताणाखाली आपली कामगिरी उत्तम करण्याचा प्रयत्न करत आहे. कोहलीच्या संतापातून भारतीय खेळाडूंमध्ये बीसीसीआयच्या कामकाज पद्धतीवर किती रोष आहे, हेही लक्षात येते. कोहलीने हिंमत दाखवून बीसीसीआयला सुनावले. कारण खेळाडूंना विश्रांतीची गरज असते याची समज बीसीसीआयला नसेल तर खेळाडूंच्या खराब कामगिरीवर बोलण्याचा संघटनेचा हक्क राहत नाही.  


बीसीसीआयने खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक क्षमतेचा विचार न करता वर्षभराचे वेळापत्रक आखले होते. या वर्षात भारताने विविध देशांसोबत टी-ट्वेंटी, एकदिवसीय, कसोटी असे एकूण ४५ सामने खेळले आहेत व डिसेंबरअखेर अजून ८ सामने या संघाला खेळायचे आहेत. म्हणजे या वर्षी ५३ सामने भारतीय संघ खेळणार आहे. डिसेंबरमधील द. आफ्रिकेचा दौरा २४ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये पुन्हा आयपीएलचा बाजार सुरू होईल. गेल्या वर्षभरातल्या भारतीय संघाच्या वेळापत्रकावर नजर टाकल्यास या संघाने २४७ दिवसांपैकी २१९ दिवस खेळले आहेत व केवळ २८ दिवसांची विश्रांती त्यांना मिळाली आहे. या विश्रांतीच्या काळात संघाने प्रवासही केला आहे. असा शारीरिक-मानसिक ताणतणावाचा दौरा व त्यातून खेळाडूंच्या उत्तम कामगिरीची अपेक्षा यांचा ताळमेळ कसा राहील, हा प्रश्न बीसीसीआयला पडलेला दिसत नाही. 


क्रिकेट हा काही पूर्वीसारखा खेळ राहिलेला नाही. खेळाडूंना कसोटी, वनडे व ट्वेंटी-२० असे तीन प्रकारे क्रिकेट खेळावे लागते. प्रत्येक खेळासाठी शारीरिक व मानसिक तयारी वेगवेगळी लागते. परदेश दौऱ्यात तर हवामान हा महत्त्वाचा मुद्दा असतो. प्रतिकूल हवामानात खेळण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. संघटनांना पैसा डोळ्यासमोर दिसत असतो, पण खेळाडूंच्या फिटनेसचा विचार केला जात नाही. क्रिकेट जगतातील सर्वच देशांचे बोर्ड हे खेळाडूंना पैशासाठी अक्षरश: राबवतात. हे राबवणेच कोहलीला पसंत पडले नाही म्हणून त्याने थेट बोर्डालाच शिंगावर घेतले. 

- सुजय शास्त्री (डेप्युटी न्यूज एडिटर, मुंबई)  

बातम्या आणखी आहेत...