आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunday Special Mumbai Diamond Bourse Moved To Gujarat

संडे स्पेशल: मुंबईचा हिरे उद्योग मोदी गुजरातला नेणार, वार्षिक 600 कोटींचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातेत खेचून नेण्यात यशस्वी झालेल्या नरेंद्र मोदींनी आता मुंबईतील अख्खा हिरे उद्योग गुजरातमध्ये हलवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सोन्याची अंडी देणारा हा उद्योग स्थलांतरित होत असताना तो टिकून राहावा म्हणून महाराष्ट्र सरकारने मात्र कोणतीही पावले उचललेली नाहीत. ढिम्म सरकारच्या उदासीनतेमुळे गुजरात पुन्हा एकदा महाराष्ट्रावर मात करेल, अशीच शक्यता आहे. हा उद्योग गुजरातमध्ये गेला तर महाराष्ट्राला कराच्या स्वरूपात मिळणार्‍या वार्षिक 600 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर कायमचे पाणी सोडावे लागेल.

काठियावाडी विरुद्ध पालपुरी!
हिर्‍यांवर पैलू पाडून त्याचे देखणे व आकर्षक जडजवाहिर बनवणार्‍या उद्योजकांच्या दबावामुळे हा उद्योग मुंबई सोडून सुरतेकडे रवाना होण्यास सज्ज झाला आहे. या उद्योगाच्या स्थित्यंतराला काठियावाडी विरुद्ध पालनपुरी अशा सुप्त अंतर्गत गटबाजीची धार असून काठियावाडी पटेलांना आपल्या सुरतेत हा उद्योग हलवायचा आहे, तर जन्म आणि मनाने मुंबईकर झालेल्या पालनपुरी जैन उद्योजकांना मात्र आता मुंबई सोडून जाण्याची इच्छा नाही.

व्यापार मुंबईतच राहावा म्हणून शर्थ - मुख्यमंत्री
हिरे व्यापार मुंबईतून सुरतेत जाऊ नये यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. हिरे उत्पादनासाठी नवी मुंबईत विशेष झोन निर्माण करून सर्व उत्पादकांना, कटर्सना तेथे जागा दिली जाईल. तसेच लवकरच आपण स्वत: हिरे व्यापार्‍यांशी याबद्दल चर्चा करू, असे चव्हाण यांनी सांगितले.

राज्य सरकार उदासीन; एकदाही चर्चा नाही
गेले अनेक महिने हिरे व्यापारातील स्थलांतरवादी आक्रमक आघाडी उघडली असताना राज्य सरकारने अद्याप एकदाही व्यापार्‍यांच्या संघटनेशी चर्चा करण्याचे सौजन्य दाखवले नाही. हिरे व्यापार्‍यांचे अनेक नेते काँग्रेसमध्ये असूनही मुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्र्यांनी कधी चर्चा केलेली नाही. एवढेच नव्हे, मुंबई सोडून जाऊ नका, असा आग्रहही उदासीन सरकारच्या वतीने कुणी केलेला नाही.

मुंबईतील आयात-निर्यात
कच्चे हिरे आयात (ढोबळ)
जून 2014 : 9529.97 कोटी रु.
एप्रिल ते जून 2014 : 30702.17 कोटी रु.
पैलू पाडलेल्या हिर्‍यांची निर्यात (प्रस्तावित)
जून 2014 : 8, 774.36 कोटी रु.
एप्रिल ते जून 2014 : 28,349.20 कोटी रु.
(जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या अधिकृत संकेतस्थळावरून)

रिअल इस्टेटलाही फटका : हिरे व्यापारात गुंतलेली 3 हजार धनाढ्य कुटुंबे ही मलबार हिलवरील वाळकेश्वर परिसरात राहतात. सुरतेला हिरे व्यापार स्थलांतरित झाल्यास या सार्‍यांना आपली मुंबईतील घरे विकून सुरतमध्ये स्थायिक व्हायचे ठरवले तर एका वेळेस ही घरे विकली जातील आणि मुंबईतील रिअल इस्टेट बाजारपेठच कोसळेल, असा दावा या स्थलांतराला विरोध करणारे नाईन डायमचे संजय शहा यांनी केला आहे.