आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sunil Tatkare Appointed Maharashtra NCP President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ANALYSIS : सुनील तटकरेंच्या निवडीमागे निवडणुकीचे अर्थकारण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बुधवारी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमागे राष्ट्रवादीचे आर्थिक गणित असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला आर्थिक साह्य तसेच उमदेवारांना मदतीची गरज लागणार असून तटकरेंमुळे ती पूर्ण होऊ शकते, असा पक्षनेतृत्वाला विश्वास वाटतो. त्यामुळेच अवघ्या चार महिन्यांवर निवडणुका आल्या असताना शरद पवारांनी नवा प्रदेशाध्यक्ष देण्याचे धाडस दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. तटकरे आता मंत्रिपदाचा राजीनामा देणार असून त्यांच्या जागी मावळते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना नेमले जाणार आहे.
अजित पवार यांच्यानंतर जलसंपदासारख्या महत्त्वाच्या खात्याची सूत्रे तटकरेंकडे आली. सिंचन घोटाळ्यात तटकरेंवरही आरोप असून त्यांनी जलसंपदामंत्री या नात्याने भरपूर माया जमविल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. दोन वर्षांपूर्वी शेकापचे जयंत पाटील यांनी तर तटकरेंच्या संपत्तीची व त्यांची भागीदारी असलेल्या सर्व कंपन्यांची कागदपत्रेच जाहीर केली होती.
भास्कर जाधवांकडून अपेक्षाभंग
मावळते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधवांकडून राष्ट्रवादीला मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र कोकणातही त्यांना आपले वर्चस्व दाखवता आले नाही. उलट सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांना काँग्रेेसविरोधात पडद्यामागून प्रोत्साहन देण्यात जाधवांचा हात होता, असे बोलले जाते. तसेच सुनील तटकरे यांच्या पराभवालाही जाधव कारणीभूत ठरले. जाधव यांचे विरोधक असलेले रमेश कदम यांनी शेकापकडून उमेदवारी मिळवून लाखाच्या घरात मते मिळवली. तसेच आक्रमक स्वभाव असल्याने सर्वांना सोबत घेऊन जाण्यात जाधव अपयशी ठरल्याचाही त्यांच्यावर ठपका आहे.
ओबीसी चेहर्‍याचाही निवडणुकीत फायदा
तटकरेंच्या रूपाने ओबीसी चेहर्‍याचाही फायदा होऊ शकतो, असे शरद पवारांचे सामाजिक गणित आहे. मराठा आरक्षण मार्गी लागत असल्याने प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधवांसारखा मराठा चेहरा ठेवून फायदा होणार नाही. याउलट तटकरे आल्यास ओबीसींचे सर्मथन मिळू शकते, असे पक्षाला वाटते. ओबीसी चेहर्‍याचा विचार करताना छगन भुजबळ या माळी, तर जयदत्त क्षीरसागर या तेली समाजाच्या नेत्यांचीही नावे होती. मात्र भुजबळांचे ओबीसी कार्ड आता पूर्वीसारखे चालत नाही आणि क्षीरसागरांकडे पक्षाची धुरा सांभाळावी, एवढी ताकद नसल्याने माळी, तेली जाऊन शेवटी गवळी समाजाला पवारांनी प्राधान्य दिल्याचे सांगितले जाते.
अजित पवारांशी निष्ठा असल्यानेच ‘बक्षीस’
राजाचे जलसंपदामंत्रिपद सुनील तटकरेंकडे असले तरी त्यावर पूर्वीप्रमाणेच अजितदादांची पकड राहिलेली आहे. विशेष म्हणजे तटकरेही पूर्वीपासून अजितदादांचे निष्ठावंत सहकारी राहिलेले आहेत. पवारांचा शब्द कधीही खाली पडू न देण्याची दक्षता तटकरेंनी कायम ठेवली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचा विचार करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर हे शिवधनुष्य पेलण्याबाबत तटकरे साशंक होते. तसेच मंत्रिपदही जाणार असल्याने ते नाराज असल्याचे बोलले गेले. पण, अजितदादांनी ‘कुठलीही शंका न ठेवता हे पद घ्या, मी सोबत आहे’ असा विश्वास दिल्याने तटकरेंनी हे पद स्वीकारल्याचे सांगितले जाते.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा धर्म पाळताना काँग्रेसने आम्हाला जादा जागा द्यायला हव्यात. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी जादा जागा वाढवून मिळण्याकरिता प्रयत्न करायला हवेत.’’
- सुनील तटकरे