आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तटकरे साहेबांच्या 'कार्पोरेट कर्तृत्त्वा'ने महाराष्ट्र सुन्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंदाजे 140 कंपन्या व सुमारे एक हजार एकर जमीन खरेदीच्या आरोपावरून वादाच्या भोवर्‍यात अडकलेले जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यापुढे मोठे राजकीय संकट ओढवण्याची शक्यता आहे. तटकरे यांनी त्यांच्या आरोपांचे खंडन केले असले तरी ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्या उलट या प्रकरणाचे ज्या वृत्तवाहिनीवरुन प्रसारण करण्यात येत होते ते लोकांनी पाहूच नये यासाठी त्यांनी रायगड जिल्ह्यातील वीज गायब करुन टाकल्याचे सूत्रांनी सांगितले.
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचा मुलगा, सून आणि मुलीच्या नावावर सुमारे 140 कंपन्या असल्याची माहिती उघड झाली आहे. कार्पोरेट कंपन्यांचा फॉर्म्युला वापरत रायगड जिल्हात हजारो एकर जमीन त्यांनी विकत घेतल्याची माहिती उघड होताच मंगळवारी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. अजित दादांचे कट्टर समर्थक असलेले सुनील तटकरे यांचे 'साम्राज्य' बाहेर काढण्यामागे नेमकी कोणी फिल्डिंग लावली याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मूळचे रोह्यातील असलेल्या तटकरे 'साहेबां'च्या या साम्राज्याने स्थानिक जनतेसह महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
तटकरे यांच्याकडे रोहा तालुक्यातच शेकडो एकर जमीन असल्याची बाब सामान्य जनतेपासून लपून राहिलेली नव्हती. मात्र या जमिनी खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या शेकडो कंपन्या स्थापन केल्याचे समोर येताच रायगडकर अवाक झाले. वृत्तवाहिनीच्या त्या वृत्ताने तटकरे 'साहेब' किती मोठे आहेत हे महाराष्ट्राला कळाले.
दरम्यान, सुनील तटकरे मंगळवारी वृत्तवाहिनीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी हजर झाले होते. मात्र त्यांच्यावर झालेल्या आरोपावर एकही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. मी किंवा माझ्या परिवारातील सदस्याने एक हजार एकर जमीन खरेदी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र किती जमीन खरेदी केल्याचे सांगणे त्यांनी शिताफीने टाळले. संबंधित जमिन माझ्या मुलाची त्याबाबत मला अधिक माहिती सांगता येणार नाही. माझ्या मुलाने व्यवहाराबाबत कधीही माझ्याशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुलाने जमीन खरेदी करणे हा त्याच्या व्यवसायाचा भाग असून, माझा त्याच्याशी कसलाही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र मुलाच्या व्यवसायाची प्रगती ही तुम्ही मंत्रीपदी असतानाच झाली असल्याचे विचारताच त्यांना काय बोलावे ते सुचत नव्हते. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी का? यावर हे राजकीय आरोप आहेत, असे सांगून उत्तर टाळले. दरम्यान, याबाबतचे प्रसारण रायगड जिल्ह्यातील लोकांना पाहता येऊ नयेत यासाठी जिल्ह्यातील वीज गायब करण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे. तटकरे अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असताना धुळे येथील बोगस छापा प्रकरणी एका निवृत्त अधीक्षकाने वृत्तवाहिनीवर सुनील तटकरेंचे नाव घेतले होते. त्यावेळी ते सर्वप्रथम प्रकाशझोतात आले होते.
आदर्श घोटाळा प्रकरणात सुनील तटकरे, निलंगेकर यांना आयोगाचे समन्स