आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supporters Of Raj Thackeray Gathered Outside His Residence

‘कृष्णकुंज’बाहेर शक्तिप्रदर्शन, मनसेच्या बड्या नेत्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी व्यक्त केला रोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजबाहेर सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या या गर्दीत मनसेचा एकही बडा नेता मात्र दिसला नाही. राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवतानाच कार्यकर्त्यांनी मनसेच्या बड्या नेत्यांच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणा दिल्या. नेत्यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांचा रोष इतका होता की संतप्त कार्यकर्त्यांनी मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांच्या गाडीची मोडतोड केली.
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या दारुण पराभवानंतर मनसेत आलेली मरगळ झटकून टाकण्याच्या उद्देशाने मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने राज यांच्या घरासमोर शक्तिप्रदर्शन केले. दुपारी एकच्या सुमारास कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली. तासाभरात राज यांच्या घराशेजारचा परिसर गर्दीने भरून गेला. कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन राज यांनी काही वेळ बाहेर येऊन गर्दीला हात उंचावून अभिवादन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

त्यानंतरही आलेले कार्यकर्ते गटागटाने आत जाऊन राज ठाकरेंना व्यक्तिश: भेटत होते. पराभवानंतरही आम्ही पुन्हा उभे राहू, अशीच भावना इथे उपस्थित असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांची होती.

अभ्यंकर यांच्या गाडीची तोडफोड
एकीकडे गर्दीतून राज यांच्या समर्थनाच्या घोषणा सुरू असताना कार्यकर्त्यांमधून मनसेच्या बड्या नेत्यांच्या विरोधात मात्र जोरदार घोषणाबाजी सुरू होती. बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर हे दोन नेते कार्यकर्त्यांमधील रोषाच्या केंद्रस्थानी होते. कार्यकर्त्यांचा रोष इतका अधिक होता की, गर्दीतील काही कार्यकर्त्यांनी जवळच उभ्या असलेल्या अभ्यंकर यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि मोडतोड केली. या वेळी उपस्थित असलेल्या गर्दीनेही त्यांच्या या कृत्याचे समर्थन केले, हे विशेष.

नऊपैकी चारच सरचिटणीस हजर
राज यांच्या निवासस्थानी राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार हे माहीत असतानाही मनसेच्या एकूण नऊ सरचिटणिसांपैकी फक्त नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, िशरीष सावंत आणि संजय चित्रे हे चारच सरचिटणीस राज यांच्यासोबत उपस्थित होते. सरचिटणिसांच्या अनुपस्थितीबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. काही कार्यकर्त्यांनी तर नेत्यांच्या अनुपस्थितीबद्दल संतापही व्यक्त केला.

आता तरी साहेबांनी आम्हाला भेटावे
राजकारणात पराभव होत असतो, तो आम्ही पचवू. मात्र आता तरी साहेबांनी आमच्याशी थेट संपर्क ठेवावा, आम्हाला भेटावे, अशी अपेक्षा बहुतांश कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

साहेबांवर विश्वास
साहेबांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. पराभव मनाला लावून घेत नाही. पुन्हा जोमाने कामाला लागणार आणि साहेबांचे हात बळकट करू, असे पनवेलचे शहराध्यक्ष विशाल सावंत म्हणाले.