आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Bans Under 18 Years Govinda To Participate In Dahi Handi

मेगा इव्हेंट दहीहंडीला आता सुप्रीम कोर्टाचाही चाप, बालगोविंदाचे मृत्यू टळणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दहीहंडी उत्सवात 18 वर्षांखालील मुलांचा सहभाग टाळणे, दहीहंडीची उंची 20 फूटांपेक्षा जास्त नसावी यासह अनेक बाबींवर मुंबई हायकोर्टाने घातलेल्या निर्बंधावर आता सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. अलीकडच्या काळात दहीहंडीला मेगा इव्हेंट समारंभाचे स्वरूप येऊ लागल्यानंतर थरांवर थर रचले जात होते. राजकीय फायदा घेण्यासाठी राजकारणी मंडळी लाखोंच्या बक्षिसाची खैरात करीत होते. मात्र, ही बक्षिसे जिंकण्याच्या मोहात अनेक बालगोविंद जखमी व मृत्यूमुखी पडल्याने मुंबई हायकोर्टाने बालगोविंदा व धोकादायक धर लावण्याला बंदी घातली होती.
ऑगस्टमध्ये दहीहंडीच्या तोंडावर मुंबई हायकोर्टाने बंदी घातल्यानंतर काही गोविंदापथकांसह आयोजकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. उत्सवाच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती देत आयोजक व गोविंदपथकांना तात्पुरता दिलासा दिला होता. मात्र, आता दोन महिन्यानंतर त्यावर अंतिम सुनावणी करीत मुंबई हायकोर्टाने घातलेली बंदी योग्य असल्याचे सांगत निर्णय कामम ठेवला आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक काढावे असा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दरम्यान, आपण सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव घेऊन आयोजक व गोविंदापथकांची बाजू मांडू असे राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
18 वर्षाखालील गोविंदाना दहीहंडीत सहभागी होण्यापासून बंदी घालण्याबरोबर कोणत्याही आयोजकांना, मंडळाना 20 फुटांपेक्षा जास्त उंचीची हंडीही बांधता येणार नाही. तसेच या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचे नाव, पत्ता, वयाचा दाखला, फोटो याबाबतची माहिती 15 दिवस अगोदर स्थानिक पोलिसांनी देऊन परवानगी घ्यावी लागणार आहे. बालहक्क आयोगाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करण्याबरोबरच डांबरी व सिमेंटच्या रस्त्यावर दहीहंडी उत्सव साजरा न करणे, गादीसारख्या मऊ थरावरच ही स्पर्धा घेणे, गोविंदाना सुरक्षा बेल्ट व हेल्मेट पुरविणे आदी निर्बंध मुंबई हायकोर्टाने घातले आहेत. दहीहंडी आयोजकांनी या सर्व उत्सवाची जबाबदारी घ्यावी. तसे न झाल्यास व यातून काही अनुचित घटना घडल्यास त्याला दहीहंडी आयोजक जबाबदार असेल असे मुंबई हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले होते.
मुंबई हायकोर्टाने घातलेल्या बंदीचे त्यावेळी काहींनी स्वागत केले होते तर गोविंदापथकांसह आयोजकांना याविरोधात आवाज उठविला होता. दहीहंडीतील उंच थरांमुळे बालगोविंदा जखमी होतात, त्यामुळे त्यांना थर लावण्यास कोर्टाने घातलेली बंदी योग्य आहे. आपण अशा निर्णयाचे स्वागतच करतो अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. तर राष्ट्रवादीचे माजी मंत्री राहिलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टाने बंदी घातल्यानंतर आव्हाड यांनी नापसंती दर्शिवली होती आता सुप्रीम कोर्टाने बंदी घातल्यावर आपण पुन्हा दाद मागणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
मागील काही वर्षापासून दहीहंडी उत्सव हा सण न राहता तो एक मेगा इव्हेंट झाला होता. त्याचा राजकीय व सामाजिक पातळीवर फायद्यासाठी वापर केला जात आहे. याचमुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून 1 लाखांपासून 25 ते 50 लाख रूपयांपर्यंत बक्षिसे ठेवली जात आहेत. अशी भलीमोठी बक्षिसे जिंकण्यासाठी हजारो युवक गोविंदा बनून या उत्सवात सहभागी होत होते. मात्र, याचकाळात काही दुर्देवी घटना घडल्या. अनेक बालगोविंद मृत्यूमुखी पडले होते तर काही जखमी होत असत. काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. या जीवघेण्या स्पर्धेच्या व मेगा इव्हेंट दहीहंडी साजरी करण्याच्याविरोधात काही जाणकार मंडळींनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्या होत्या. जनतेच्या भावनेची दखल घेत मुंबई हायकोर्टाने 18 वर्षाखालील गोविंदांच्या सहभागाला बंदी घातली होती. याबरोबर हा उत्सव साजरा करताना ही अटी घालून दिल्या आहेत. काँग्रेससह शिवसेनेने याचे स्वागत केले होते. राज्यातील प्रमुख गोविंदापथकांनी व आयोजकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी सामान्य नागरिकांनी याचे स्वागत केले आहे.
मुंबई हायकोर्टाने या निर्णयाचा फेरविचार करावा याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्या तत्कालीन सरकारने विनंती करणारी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. बंदीचा निर्णय जाहीर करताना हायकोर्टाने घातलेल्या अटी-शर्तींची अंमलबजावणी यंदा (ऑगस्ट 2014मधील दहीहंडी उस्तव) करता येणे अशक्य असल्याची भूमिका मांडल्याने सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. आता मात्र, कोर्टाने थेट बंदी घातली आहे. दरम्यान, राज्यात आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार आले आहे हे सरकार काय भूमिका घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या दहीहंडीत उत्सवादरम्यान दोन गोविंदा थरावरून कोसळून मृत्यू झाला होता.