आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supriya Sule News In Marathi, Eknath Khadse, Maharashtra Politics

सुप्रिया सुळेंच्या नावाने कोटींची जमीन लाटली; एकनाथ खडसे यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुप्रिया सुळे यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या ट्रस्टने पुणे, मुंबई व नाशिक शहरांमधील विविध सार्वजनिक भूखंड लाटण्यात आले आहेत. ऐंशी हजार कोटी रुपयांच्या या गैरव्यवहाराची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

खडसे म्हणाले, गेली चार वर्षे आपण या महाप्रचंड जमीन घोटाळ्या विषयी विधानसभेत आवाज उठवला, मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, राज्यपालांना भेटलो व केंद्रीय दक्षता आयोगाकडेही दाद मागितली. माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या कागदपत्रांच्या स्वरुपात भक्कम पुरावे सादर करूनही राज्य सरकारने त्याची चौकशी केली नाही.

दोन दिवसांपूर्वी यापैकी काही प्रकरणात पुण्यात पोलिसांकडे एफआयआर दाखल झाले असले तरी ते पुरेसे नाहीत. राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विशेष चौकशी पथक नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी अपेक्षा खडसेंनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना भेटून आपण या प्रकरणात चौकशीची मागणी करणार आहोत. या भूखंडांपैकी काही केंद्रीय संरक्षण खात्याच्या मालकीचे आहेत. त्यामुळे पंतप्रधान या संस्थेचे अध्यक्ष असल्याने केंद्र सरकार चौकशी सुरू करू शकते, असेही खडसेंनी सांगितले.

घोटाळ्याची पद्धत
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, शाहिद बलवा, अतुल चोरडिया यांच्या संस्थेच्या नावे सार्वजनिक जमिनीसाठी अर्ज येत. राज्य सरकार व महापालिकेच्या अधिकारी नियमबाह्य पद्धतीने सार्वजनिक भूखंड बहाल करायचे. जमीन हस्तांतरित झाली की, सुळे दांपत्य शेअर काढून घ्यायचे, अशी पद्धती या गैरव्यवहारात अवलंबली गेल्याचे खडसे म्हणाले.