आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी वंचितांचा आठवड्यात निर्णय घेऊ - सुरेश धस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई तालुक्यातील 11 हजार शेतकर्‍यांना कर्ज माफी योजनेच्या लाभाबाबत येत्या आठ दिवसांत निर्णय घेऊन पैसे दिले जातील, असे आश्वासन राज्याचे सहकार राज्यमंत्री सुरेश धस यांनी शनिवारी विधान परिषद सभागृहात दिले.
सन 2009 मध्ये संपूर्ण राज्यात कर्जमाफी योजना राबवली गेली होती. मात्र, परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई तालुक्यातील 11 हजार शेतकर्‍यांना कर्ज माफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. यासंदर्भात गेल्या वर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने संबंधित शेतककर्‍यांना योजनेचा लाभ महिन्याच्या आत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या शेतकर्‍यांना पैसे मिळालेले नाहीत ही बाब आमदार अमरसिंह पंडित यांनी तारांकीत प्रश्नाद्वारे उपस्थित केली होती.

सहकार राज्यमंत्री सुरेश धस म्हणाले, 21 जानेवारी 2014 रोजी एक बैठक घेतली होती. या बैठकीत राज्यातील कर्जमाफी योजनेचा आढावा घेण्यात आला. पीकविमा नुकसान भरपाई योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी कर्जमाफी योजनेतून वंचित राहिल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील शेतकर्‍यांचा प्रस्ताव सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्यामार्फत सरकारला सादर करण्यात आला आहे.

कर्जमाफी योजनेच्या अटी व शर्तींचा भंग करुन काही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल वित्त विभागाने नोंदवलेल्या अभिप्रायामुळे हा विषय रेंगाळला होता. मात्र, येत्या आठ दिवसात यासंदर्भात बैठक घेऊन संबंधित शेतकर्‍यांना तातडीने योजनेच्या लाभाचे पैसे दिले जातील, असे आश्वासन यावेळी धस यांनी दिले.