आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Kalmadi Indicted For Irregularities In Commonwealth Youth Games

कलमाडींवर फौजदारी गुन्हाच दाखल करा !, लोकलेखा समितीची शिफारस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात सुमारे 25 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस लोकलेखा समितीने बुधवारी विधानसभेत केली. समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी हा अहवाल सादर केला.

2008मध्ये पुण्यात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्य सरकारने 425 कोटी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता, तरीही कलमाडी यांच्या अध्यक्षतेखालील आयोजन समितीने ऑगस्ट 2008मध्ये 32 कोटी 95 लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी केली होती. राज्याच्या आकस्मिकता निधीतून ही रक्कम देण्यात आली. त्यापैकी 25 कोटी 12 लाख रुपयांची रक्कम आयोजन समितीला दिल्याचे क्रीडा संचालकांनी सांगितले. ही रक्कम कोणत्या कामासाठी वापरण्यात आली व हा खर्च करताना कुठली कार्यपद्धती अवलंबण्यात आली, असा प्रश्न लोकलेखा समितीने स्पर्धा आयोजन समितीला विचारला होता.या खर्चाचा हिशेब वारंवार मागूनही हा तपशील आयोजकांकडून मिळाला नाही. त्यामुळे या रकमेचा गैरव्यवहार झाला असल्याचा निष्कर्ष लोकलेखा समितीने आपल्या अहवालात नमूद केला आहे.

अधिका-यांवरही कारवाई करा
या गैरव्यवहारप्रकरणी कलमाडी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा व यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती तीन महिन्यांत कळवावी, अशी शिफारस लोकलेखा समितीने केली आहे. आकस्मिकता निधीची रक्कम निष्काळजीपणे वितरित करणारे क्रीडा संचालक व संबंधित अधिका-यांविरोधातही शासनाने कडक कारवाई करावी, अशीही शिफारसही समितीने केली आहे.

25 कोटींचा हिशेब एका पानात
अपवादात्मक परिस्थितीत आकस्मिकता निधी काढता येतो. राज्य सरकारने या स्पर्धांसाठी अगोदरच निधी दिला असल्यामुळे आकस्मिकता निधीतून पैसे देण्याचे काहीच कारण नव्हते. या पैशाचा विनियोग कशा प्रकारे करण्यात आला, याबद्दल सनदी लेखापालांकडून प्राप्त झालेल्या उपयोगिता प्रमाणपत्रामध्ये अत्यंत त्रोटक माहिती आहे. 25 कोटी रुपयांचा हिशोब फक्त एका पानात दिल्याबद्दल समितीने आश्चर्य व्यक्त केले.