आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Prabu May Head Of Modi Govt\'s Think Tank

नियोजन आयोगाऐवजी मोदींचा \'थिंक टॅंक\'; सुरेश प्रभूंकडे प्रमुखपदाची धुरा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- सुरेश प्रभू)
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात नियोजन आयोगाऐवजी नवी व्यवस्था आणणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार नियोजन आयोगाची जागा आता 5 सदस्य असलेला 'थिंक टॅंक' घेण्याची शक्यता आहे. या थिंक टॅंकच्या प्रमुखपदी मराठमोळे व शिवसेनेचे माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान या थिंक टॅंकचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. तर प्रभूंकडे उपाध्यक्षपद असेल. येत्या एक-दोन दिवसात याबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. उत्पादकता आयोग (प्रोडक्टिविटी कमीशन) असे या थिंक टॅंकचे नाव असू शकते. दरम्यान, वैभवशाली परंपरा असलेला नियोजन आयोग गुंडाळणे हे देशासाठी दुर्देवी बाब असल्याचे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
सध्या 8 सदस्य असलेल्या नियोजन आयोगाला बदलत्या काळानुसार व गरजेनुसार नवे स्वरूप देण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. नियोजन आयोगाऐवजी 5 सदस्य असलेला थिंक टॅंक सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यात विविध क्षेत्रातील सदस्यांचा समावेश असेल. दोन अर्थशास्त्रज्ञ, एक समाजशास्त्रज्ञ, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक तज्ज्ञ आणि एक अभ्यासू राजकारणी अशी त्याची रचना असावी असे मोदींच्या सल्लागारांना वाटते आहे. त्यानुसार या थिंट टॅंकच्या प्रमुखपदी सुरेश प्रभूंचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते. याचबरोबर मुक्त व्यापार व्यवस्थेचे अभ्यासक व अर्थतज्ज्ञ अरविंद पानगरिया, विवेक देवरॉय यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या दोघांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींच्या सल्लागार मंडळात काम पाहिले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान आणि समाजशास्त्र तज्ज्ञांच्या नावाबाबत विचार सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबाबत काही नावे सुचवली आहेत. त्यावर विचार होत आहे.
दरम्यान, हा थिंक टॅंक सर्वप्रथम अर्थव्यवस्थेवर काम करेल. अर्थसंकल्प व पहिल्या टप्प्यात कोणत्या-कोणत्या बाबींना व कामांना प्राधान्य द्यायचे यावर काम पाहील. याचबरोबर अर्थव्यवस्था रूळावर आणायची असेल तर वित्तीय तूट करणे यावर भर असेल. त्यानंतर देशाला भेडसवणा-या सर्वात गंभीर समस्यांवर काम केले जाईल. यात कृषी धोरण, तेल आयात कमी करणे, पायाभूत सुविधांवर भर देण्यासह रोजगार निर्मितीवर भर हे विषय मोदी सरकारच्या अजेंड्यावर असतील असे बोलले जात आहे. याकामी थिंक टॅंक मदत करेल. तसेच कुठला पैसा कोठे वापरायचा याची वेळोवेळी माहिती देईल. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे आव्हानात्मक काम असेल पण त्यासाठी प्रयत्न करण्याची एकही संधी वाया घालवायची नाही असे मोदी सरकारने लक्ष्य निर्धारित केले आहे.
पुढे वाचा, काँग्रेस-लालूचा नियोजन आयोग बरखास्तीला विरोध...