आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युरींशी चर्चा न करताच इफ्फीतून न्यूड, एस दुर्गा हे चित्रपट वगळल्याने घोष यांचा राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गोव्यातील ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागासाठी न्यूड, एस दुर्गा यासह काही िचत्रपट ज्युरींनीच निवडले होते. त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो. तो बदलायचा असेल तर केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने प्रथम ज्युरींशी चर्चा करणे आवश्यक होते. पण ज्युरींना अंधारात ठेवून दोन्ही िचत्रपट वगळण्याचा निर्णय झाल्याने सिनेक्षेत्रात प्रचंड नाराजी पसरली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध म्हणून चित्रपट दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी इफ्फी ज्युरी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 

इफ्फीसारख्या महोत्सवांमध्ये कोणते चित्रपट निवडले जावेत यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण खाते सिनेक्षेत्रातील अनुभवी दिग्दर्शक, जाणकारांची एक समिती नेमते. समितीपुढे येणाऱ्या चित्रपटांचे बारकाईने निरीक्षण करून महोत्सवासाठी विविध भाषांतील चित्रपट निवडले जातात. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम मानला जातो. परंतु निर्णयात परस्पर बदल झाल्याने सरकारने अपमान केल्याची भावना ज्युरींमध्ये पसरली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भातील स्पष्टीकरणही दिलेले नाही.   

ज्युरींनी हे दोन्ही चित्रपट निवडले नसते तर चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक यांना काहीच आक्षेप नव्हता. पण ज्युरींचा निर्णय परस्पर बदलल्याने सिनेसृष्टीत संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत आशयघन मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्येही मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळत आहे. त्यामुळेही इफ्फीसारख्या महोत्सवात २६ पैकी नऊ मराठी चित्रपट निवडले गेले. 
 
चर्चा करणे बंधनकारकच  
चित्रपटांची यादी सप्टेंबरमध्ये पाठवली. निर्णय बदलण्याआधी ज्युरींशी बोलणे बंधनकारक होते. पण तसे न झाल्याने ज्युरींना आपला अपमान झाला असे वाटणे साहजिकच आहे, असे ‘न्यूड’ चे दिग्दर्शक रवी जाधव यांनी म्हटले.
 
बातम्या आणखी आहेत...