आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - पोलिस अधिका-याला विधानभवनात झालेल्या मारहाणप्रकरणी नेमलेल्या आमदारांच्या समितीची सोमवारी विधान भवनामध्ये बैठक होईल आणि पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना सोमवारी चौकशीसाठी समितीसमोर बोलावण्यात येणार असल्याचे समजते. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिला बैठक आज होऊन चौकशीची दिशा निश्चित करण्यात आली.
सूर्यवंशी, निलंबित आमदार, या प्रकरणाशी संबंधित इतर पोलिस अधिकारी, सूर्यवंशी यांचा अहवाल देणारे डॉक्टर यांनाही चौकशी समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. कायदा व विधी सचिवांचा सल्लाही समिती घेणार असल्याचे समजते. प्रत्यक्ष मारहाण झाली त्या वेळी उपस्थित सुरक्षा अधिकारी, इतर साक्षीदार यांनाही चौकशी समितीसमोर उपस्थित राहावे लागणार आहे. विधानमंडळातील सीसीटीव्ही फुटेजही समिती तपासून पाहणार आहे. सोमवारपासून रोज या समितीची बैठक होणार असून लवकरात लवकर समितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. या समितीमध्ये बहुतेक वकील असल्याने प्रत्येक नियमावर बोट ठेवून पोलिसांना प्रश्न विचारले जाणार आहेत.
आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह राम कदम, जयकुमार रावल, प्रदीप जैस्वाल व राजन साळवी यांना निलंबित करण्यात आले होते, विधानभवन परिसरातही येण्यावर बंदी घालण्यात आली होती. आमदारांच्या वाढत्या दबावामुळे सूर्यवंशी यांचेही निलंबन केले. मात्र, या आमदारांना चौकशीसाठी विधानभवनात हजर राहावे लागणार असल्याने तसा ठराव संमत करण्यात आला.
अशी मिळाली परवानगी
संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेमध्ये मांडलेल्या प्रस्तावात चौकशी समितीसमोर हजर राहण्यासाठी या आमदारांना विधानभवनाच्या आवारात येण्याची परवानगी देण्यात यावी, असे म्हटले होते. त्यामुळे यापुढे चौकशी समितीने बोलावल्यावर या आमदारांना विधान भवनामध्ये हजर राहता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.