आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्दू बंदिशींमुळे सावरकर समजले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंदमानच्या काळकोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही उर्दू बंदिशी, हिंदी रचनाही लिहिल्या. या कलाकृतींवर अलीकडेच एक अल्बम निघाला. प्रसिद्ध गायिका जसपिंदर नरुला यांनी त्यातील एक गीत गायिले आहे. या निमित्ताने त्यांनी सावरकरांविषयी आणखी अभ्यास केला. त्यांच्या चरित्राने त्या अक्षरश: भारावून गेल्या. स्वा. सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त जसपिंदर यांच्या भावना त्यांच्याच शब्दांत..

प्राणाचीही पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध लढणार्‍या स्वातंत्र्यसेनानींत विनायक दामोदर सावरकर यांचे एक वेगळे स्थान आहे. एक प्रतिभावान साहित्यिक, कवी असलेले सावरकर काळाच्याही पुढचा विचार करणारे द्रष्टे विचारवंत होते. सावरकरांच्या उर्दू बंदिशी व हिंदी रचनांच्या अल्बमच्या निमित्ताने मला त्यांच्याविषयी अभ्यासाची संधी मिळाली. इतिहासाच्या पुस्तकात धडा असल्याने छत्रपती शिवरायांबद्दल मला माहिती होती; परंतु सावरकरांविषयी फार काही माहीत नव्हते.

अल्बमचे संगीतकार भारत बल्लवली यांनी सावरकरांच्या कवितांविषयी सांगताना त्यांच्या कार्याचा इतिहासच मला सांगितला. ऐकून मी चकितच झाले. पुढे मी सावरकरांविषयी आणखी माहिती मिळवली आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मी पुरती भारावून गेले. हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेवरील सावरकरांचे प्रचंड प्रभुत्व, काळाच्या पुढे विचार करण्याची कमालीची शक्ती आणि विशेष म्हणजे तुरुंगात भिंतीवर कोरलेल्या कविता कंठस्थ करणार्‍या सावरकरांनी मला थक्क करून टाकले.

शिक्षेतही कविता कशा सुचल्या?
अंदमानातील शिक्षा भोगतानाच्या परिस्थितीची कल्पना केली तरी एवढ्या तरल कविता त्यांना कशा सुचल्या असतील. याचे आश्चर्य वाटते. आज कोणीही हे करू शकत नाही. सावरकरांना देवाने अद्भुत शक्तीच दिलेली होती, असे मला वाटते. सावरकरांच्या साहित्याशी माझा संबंध आला, त्यांचे व्यक्तिमत्त्व, विचार जाणून घेता आले हे मी माझे भाग्यच समजते. अन्यथा एवढ्या थोर महापुरुषाबद्दल मी अनभिज्ञच राहिले असते. जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला या सर्वश्रेष्ठ रचना त्यांच्या उत्तुंग प्रतिभेसोबतच जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवणार्‍या आहेत.

स्वातंत्र्यवीरांविषयी कार्याची योजना
देशासाठी सर्वस्व समर्पित करणार्‍या या लोकोत्तर मंडळींना आपण म्हणावे तसे हृदयात आणि समाजात स्थान दिलेले नाही. आपल्या कुटुंबीयांची, कारकीर्दीची पर्वा न करता त्यांनी देशासाठी आयुष्य वेचले. त्यांच्यासाठी सोडा, पण देशासाठी तरी आपण काय केले, असा प्रश्न मला पडला आहे. अशा स्वातंत्र्यवीरांविषयी काही तरी करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. तशी योजनाही मी आखत आहे.

सावरकर एका पक्षाचे नव्हे, तर देशाचे
जनतेची सेवा करण्यासाठी मी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. तेव्हा सावरकरांच्या विचाराने प्रेरित पक्षात का गेला नाहीत, असे विचारण्यात आले. त्यावर मी एवढेच म्हणाले की, सावरकर हे कोणा एका पक्षाचे नाहीत, तर संपूर्ण देशाचे आहेत. देशासाठी समर्पित थोरांची अशी वंचना करता कामा नये, असे मला वाटते.

शब्दांकन : चंद्रकांत शिंदे