आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकावर बंदीची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक उल्लेख असल्याचा आरोप करत युवा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्र्रवारी हे पुस्तक जाळण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीची विक्री थांबवून त्यावर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

‘शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवतात, अशी घटना इतिहासात आहे. मात्र सावरकरांच्या या पुस्तकामध्ये या घटनेचा उल्लेख करून शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे. आम्ही त्याचा निषेध करतो,’ असे संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. ‘या पुस्तकात ठिकठिकाणी महिलांबद्दल अवमानकारक उल्लेख आहेत, बौद्ध धर्माबद्दल अनुद्गार आहेत. त्यावर आमचा आक्षेप असून या पुस्तकाची विक्री बंद व्हायला हवी. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गुरुवारीच याबाबत निवेदन दिले आहे. सावरकरांच्या या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीची विक्री त्वरित थांबवण्यात यावी, अशी मागणी केली आहे, असे पाटील म्हणाले.

सावरकरविरोधी घोषणाबाजी
इतक्या वर्षांनी हे आंदोलन करण्याचे काय कारण, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पाटील म्हणाले की, आमच्या समाजात आता वाचन संस्कृती रुजतेय आणि त्यामुळे लोकांना त्यातील मजकूर आक्षेपार्ह वाटत आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही, असेही त्यांनी सांगितले. दादर येथील स्वातंत्र्यवीर स्मारकासमोर कार्यकर्त्यांनी पुस्तक जाळायचे होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी अटक केली. तरीही या वेळी कार्यकर्त्यांनी सावरकरविरोधी घोषणाबाजी केली.