आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा हमी कायद्यांतर्गत 26 जानेवारीपासून 250 सेवा मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा हमी कायदा लागू करणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून राज्यात सेवा हमी कायदा लागू करण्यात आला. त्यात आत्तापर्यंत शासकीय कार्यालयातील केवळ ४६ सेवा देण्यात येत आहेत.

मात्र यात आता आणखी काही सेवांचा समावेश करून २६ जानेवारी २०१६ पासून २५० सेवा ऑनलाइन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली. आपले सरकार या सरकारच्या वेब पोर्टलच्या माध्यमातून या सेवा जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सरकारी काम असेल की सामान्य जनतेला नकोसे होते. फाइल या टेबलवरून त्या टेबलवर जाण्यासाठी पैसे चारण्याशिवाय गत्यंतर राहत नसे आणि त्यातही काम वेळेवर होईल याची खात्रीही दिली जात नसे. त्यामुळे सामान्य जनता अत्यंत त्रस्त झालेली होती. राज्यातील त्रस्त जनतेला त्यांना हव्या असलेल्या सरकारी सेवा घरबसल्या ऑनलाइन मिळाव्यात म्हणून क्रांतिकारी निर्णय घेत राज्य सरकारने सेवा हमी कायदा लागू केला. या कायद्याअंतर्गत २७६ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. कामासाठी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच न देता काम व्हावे असा प्रयत्न या सेवा हमी कायद्याअंतर्गत केला जाणार आहे.

सेवा हमी कायद्यांतर्गत दाखला किंवा प्रमाणपत्र देण्यास विलंब लागल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड वेतनातून वसूल करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

सध्या मिळणाऱ्या सेवा
पहिल्या टप्प्यात महसूल, वन, नोंदणी व मुद्रांक, ग्रामविकास, उद्योग, ऊर्जा, जलसंपदा, कौशल्य विकास या विभागांतील जन्म, मृत्यू, ज्येष्ठ नागरिक, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, शेतकरी असल्याचा दाखला, भूमिहीन प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, रहिवासी प्रमाणपत्र, हयातीचा दाखला, ग्रामपंचायतीकडून येणे दाखला, विधवा असल्याचा दाखला, नोकरी उत्सुक नोंदणी, मुद्रांक नोंदणी आदी ४६ सेवा गांधी जयंतीपासून राज्यात सुरू झाल्या आहेत. आता त्यात भर घालून एकूण २५० सेवा देण्याच्या दृष्टीने सरकारचे माहिती आणि तंत्रज्ञान विभाग काम करीत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून २६ जानेवारी २०१६ पासून या सेवा ऑनलाइन होतील, असेही मुख्य सचिवांनी स्पष्ट केले.

नवीन वर्षात मिळणाऱ्या सेवा
>महसूल, कृषी, गृहनिर्माण- नॉन क्रीमी लेअर दाखला, तात्पुरते रहिवास प्रमाणपत्र, माती-पाणी नमुना तपासणी, ठिबक सिंचन उत्पादक नोंदणी, मासेमारी नौकांची नोंदणी व मासेमारी परवाने, बांधकाम परवाने, झोन बदल व भाग नकाशा, भोगवटा प्रमाणपत्र, हयातीचा दाखला, वारसा हस्तांतर, सदनिका हस्तांतरण

>सहकार- सहकारी संस्था नोंदणी व नूतनीकरण.

>गृह विभाग- पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

>परिवहन- वाहनांची नोंदणी, वाहनाचे हस्तांतरण, दस्त नोंदणी बदल, दस्ताची नक्कल

>पाणीपुरवठा- नळ जोडणी

>अन्य- अग्निशमन यंत्रणा मंजुरी, मालकी हक्कांचे हस्तांतर