आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोकणात २३ फूट तूर झाडाचा वाढदिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माणसाचा वाढदिवस तुम्हाला आम्हाला माहीत आहे, पण आपण वाढवलेल्या झाडाचा जन्मदिवस साजरा करणारा अवलियाच असावा लागतो! वांगी, मिरची व तूर या वनस्पतींना २० फुटांपेक्षा जास्त वाढवत त्यांना झाडांचा मान मिळवून देणार्‍या

कोकणातील भगवान बोवलेकर या शेतकर्‍याने नुकताच आपल्या २३ फूट तुरीच्या झाडाचा हॅपी बथर्ड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी अधिकारी व तज्ज्ञ यांच्या साथीने अगदी साग्रसंगीतपणे साजरा केला. तुरीचे औक्षण तर झालेच, पण नंतर केकही कापण्यात आला...

सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचा बोवलेकर हा युवक लहानाचा मोठा झाला तो नारळ, पोफळी, आंबा, कोकम, जांभूळ, काजू ही उंच झाडे बघत. पण ही उंच झाडे बघताना मान वर करायला लागायची. मात्र मिरची, वांगे, टोमॅटो, तुरी, भेंडी या भाज्या मात्र खाली मान करूनच पाहाव्या लागतात... असे का? या भाज्याही मान वर करूनच पाहण्याच्या जिज्ञासेपोटी त्याने प्रथम वांग्याचे रोप २४ फूट वाढवले, तर मिरचीलाही २० फुटांवर नेले आणि आता तुरीच्या झाडाला २३ फुटांपर्यंत वाढवले आहे. कुठलीही रासायनिक खते न वापरता फक्त सेंद्रिय खतांवर बोवलेकर यांनी राेपांची झाडे करण्याचा हा आगळावेगळा पराक्रम केला आहे.

अगदी छोट्या बाळाप्रमाणे त्यांनी आपल्या रोपांची निगा घेतली असल्याने वाढदिवसही साजरा करण्याची कल्पना या निगेतूनच जन्माला आली आहे. यातून पुढाकार घेत भगवान बोवलेकर यांनी झाडाचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतील गावकर्‍यांकडून कौतुक केले जात आहे. कोकणातील वेंगुर्ले हे गाव पर्यटनात अग्रेसर असून त्याला कृषीची जोड दिल्यास हा पॅटर्न सर्व राज्यभर लोकप्रय होईल, असे मनोगत बोवलेकर व्यक्त करतात.

विक्रमी झाडांचा ‘वेंगुर्ले पॅटर्न’ व्हावा
वाढदिवसाचे औचित्य साधून बोवलेकर यांनी आपल्या पत्नीच्या साथीने प्रथम झाडाचे औक्षण केले आणि त्यानंतर कृषी अधीक्षक तथा प्रकल्प संचालक एन. जी. वाकडे यांच्या हस्ते झाडासमोर केक कापला. या वेळी सुरेश धर्णे व अनंत प्रभू आजगावकर या राज्य पुरस्कार विजेत्या शेतकर्‍यांनी आजगावकरांची ही विक्रमी झाडे वेंगुर्ले पॅटर्न ठरावीत, असे प्रयत्न सरकारच्या पातळीवरून व्हायला हवा, असे आवाहन केले.