आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तिसरी घंटा होते आणि रंगमंचावरचा पडदा बाजूला सरकतो, सभागृहात हळूहळू होत जाणा-या अंधारातून ‘नाटक’ जन्माला येते. प्रेक्षकांना वेगळ्याच अनुभूतीचा प्रत्यय आणणा-या नाटकाला जगवण्यासाठी अनेक कलाकार झटत असतात या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी ‘अखिल भारतीय नाट्य परिषदे’तर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदा नाट्य पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे ‘लोकनाट्य’अंतर्गत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना देण्यात आलेला पुरस्कार.
तमाशा कलेला राष्ट्रीय स्तरावर नेलेल्या मुंबई-पुण्यात प्रचलित असलेल्या ‘नाटकाशी’ तसा संबंध नसलेल्या रघुवीर खेडकर यांना ‘दादू इंदुरीकर स्मृति पारितोषिक’ देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लोकनाट्यातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणा-या सविता मालपेकर यांनाही ‘गणेश इंदुरीकर स्मृति पारितोषिक’देऊन गौरवण्यात येणार आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 14 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे नाट्यशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि नाटककार सई परांजपे, सतीश आळेकर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, नाट्य समीक्षक आणि नाटककार राजीव नाईक, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये आणि राजन भिसे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या पुरस्कारांचे वितरण 17 जून रोजी यशवंत नाट्यमंदिर येथे तीन सत्रात पार पडेल अशी माहिती नाट्यपरिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी दिली. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात ‘दुर्गा झाली गौरी’, ‘संगीत कोणे एके काळी’ या नाटकांच्या सादरीकरणासोबतच मनोरंजनाचा कार्यक्रमही होणार आहे. नाट्य परिषदेने यावर्षी रंगमंचाशी निगडित काही खास व्यक्तींनाही पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. यात शिवाजी मंदिर येथे चहा देणारा बाळू यांच्यासह सुतारकामासाठी विक्रम पांचाळ यांनाही गौरविण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातील‘रिहर्सल हॉल’ची डागडुजी करून ते अद्ययावत सभागृह म्हणून प्रायोगिक नाटकांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी वंदना गुप्ते यांनी आईच्या नावे रुपये 10 लाख देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली.

सुहास जोशी यांना जीवनगौरव
रंगमंचावरील अतुल्य कामगिरीबद्दल अभिनेत्री सुहास जोशी आणि सतीश आळेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. 25,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याखेरीज अद्वैत दादरकर, पुरुषोत्तम बेर्डे, अमृता सुभाष, अशोक हांडे, लता नार्वेकर, सुबोध भावे यांच्यासह अनेक कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे.