मुंबई - सात सक्कं त्रेचाळीस, रावण अँड एडी, द एक्स्ट्रॉज, रेस्ट इन पीस, ककोल्ड, बेडटाइम स्टोरी यासारख्या अनेक गाजलेल्या साहित्यकृती लिहिणारे प्रख्यात लेखक किरण नगरकर यांना यंदाचा टाटा लिटरेचर लाइव्ह जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मानपत्र व पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून एक नोव्हेंबर रोजी मुंबई लिटफेस्ट या महोत्सवात वितरण हाेणार आहे. याआधी हा पुरस्कार एमटी वासुदेवन नायर, खुशवंतसिंग, व्ही. एस. नायपॉल, महाश्वेतादेवी आदी प्रख्यात साहित्यिकांना प्राप्त झालेला आहे.
नगरकर हे समाजाच्या विविध अंगांचा शोध घेणारे प्रयोगशील लेखक आहेत. त्यांना ककोल्ड या साहित्यकृतीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे जर्मनीच्या सरकारने त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट या पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच लिटरेचर झुरिक व पीडब्ल्यूजी फाउंडेशन यांनी संयुक्तरीत्या नगरकर यांना रायटर इन रेसिडेन्स या पुरस्काराने याआधी गौरवलेले आहे.
जबाबदारी वाढली : नगरकर
‘लहानपणी वाचायची आवड होती. तरुणाईपासून आजतागायत सातत्याने लेखन करत आलो आहे. लिहिणे हा माझ्यासाठी आनंदाचा भाग आहे. आपल्या साहित्यकृतीतून विनोदाची पेरणी करणे हे तसे सोपे काम नाही. मी माझ्या लेखनातून वाचकांसमोर काही गोष्टी मांडतो. काही प्रश्न उभे करतो. वाचकांनी अंतर्मुख होऊन त्यांचा विचार करायचा असतो. समाजातील वाढती असहिष्णुता व हिंसाचार मला नकोसा वाटतो. आता हा पुरस्कार मिळाल्याने आनंद निश्चित झाला आहे. त्याबरोबरच लेखक म्हणून माझी जबाबदारी अजून वाढली आहे,’ अशा भावना नगरकर यांनी व्यक्त केल्या.