आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tata Motors Managing Director Karl Slym Left 'suicide Note': Thai Police

‘टाटा मोटर्स’च्या एमडींचा गूढ मृत्यू; सुसाइड नोट सापडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक/ मुंबई - टाटा मोटर्सचे एमडी (व्यवस्थापकीय संचालक) कार्ल स्लिम यांचा रविवारी बँकॉकमध्ये (थायलंड) एका हॉटेलमध्ये गूढ मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह चौथ्या मजल्यावर सापडला. पत्नीसह ते बाविसाव्या मजल्यावरील खोलीत थांबलेले होते. त्यामुळे या मजल्यावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्लिम यांच्याजवळ एक तीनपानी पत्र सापडले आहे. मात्र, ते इंग्रजी भाषेत असल्याने त्याचा थाई भाषेत अनुवाद केला जात आहे.

स्लिम यांचा कुणाशी वाद झाला असावा किंवा खिडकीतून ते पडले असावेत, या निष्कर्षावर येण्यास पोलिस तयार नाहीत. कारण, खिडकी उघडी असली तरी ती एवढी लहान आहे की स्लिम यांच्यासारखा जाड अंगकाठीचा एखादा माणूस तेथून तोल जाऊन पडू शकत नाही. त्यामुळे पोलिसांच्या प्रारंभिक अंदाजानुसार खिडकीत चढून त्यांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी मारली असावी.

कार्ल स्लिम ब्रिटिश नागरिक
कार्ल स्लिम (51) ब्रिटिश नागरिक होते3 2012 मध्ये त्यांनी कंपनीचे नेतृत्व स्वीकारले. वाहन उद्योगाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत आव्हानात्मक होता. भारतीय बाजारपेठेत टाटाच्या वाहनविक्रीत वाढ होण्याच्या दृष्टीने रणनिती आखण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. यापूर्वी स्लिम चीनच्या एसजीएमडब्ल्यू मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष होते. टोयोटा आणि जनरल मोटर्समध्येही त्यांनी अनेक पदांची जबाबदारी सांभाळली.

आव्हानाच्या काळात नेतृत्व
टाटा समूहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांनी स्लिम यांच्या मृत्युबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले. अत्यंत आव्हानात्मक काळात स्लिम यांनी कंपनीला सक्षम नेतृत्व दिल्याचे टाटाने प्रसिद्ध केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

हत्येच्या शक्यतेचा इन्कार
थायलंड पोलिसांनी हत्येची शंका गृहीत धरून तपास सुरू केला आहे. गेल्या 24 जानेवारीला ते बँकॉकमध्ये आले होते. शांग्रिला या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्नीसह ते उतरले होते. रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. पोलिस स्लिम यांच्या 30 वर्षीय पत्नीचीही चौकशी करत आहेत.