मुंबई - माध्यमिक विभागासाठी 70 विद्यार्थ्यांमागे एक तुकडी या नव्या निकषाची अंमलबजावणी करण्याच्या विरोधात शिक्षक, शिक्षण संस्थांसह विविध संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्यातील शाळा 1 जुलैपासून बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अंतर्गत राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा आदींच्या शिक्षक, संस्थाचालकांच्या प्रतिनिधींची मुंबईत सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नव्या निकषाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे. यात 2६ जून रोजी विदभात तर उर्वरित राज्यात 25 जून रोजी सर्व विदभार्तील जिल्हा आणि तालुकास्तरापर्यंत मोर्चे काढण्यात येणार आहेत. तसेच सर्व जिल्हा शिक्षणाधिकार्यांना निवेदने देणार आहेत. मुंबईसह पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसह शिक्षण संस्थांच्या प्रमुखांचा मोर्चा 2७ जून रोजी आझाद मैदानात काढला जाणार आहे.
काय आहे भीती?
माध्यमिक विभागासाठी (9 वी, 10 वी) नव्या निकषानुसार ७0 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी असेल. दुसरी आणि तिसरी तुकडी 50 विद्यार्थ्यांची असणार आहे. या प्रमाणामुळे शेकडो शाळांच्या हजारो तुकड्या बंद होतील. त्यामुळे राज्यातील किमान ६0 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरतील.