आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teachers Not Interested For Teacher Aptitude Test

पात्रता परीक्षेकडे शिक्षकांची पाठ, अत्यल्प निकालाचा धसका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शालेय शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात सुरू केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) मागच्या वर्षी ६ लाख २१ हजार अर्ज आले होते. यंदाच्या टीईटीसाठी केवळ ३ लाख ८५ हजार अर्ज आले असून गेल्या वर्षीच्या अल्प निकालाचा उमेदवारांनी धसका घेतला असून त्यामुळेच या भावी शिक्षकांनी चक्क परीक्षेकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी टीईटी परीक्षेत पहिली ते पाचवीसाठीचे ४.४३ टक्के तर सहावी ते ८ वीसाठीचे केवळ ५.९५ टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले होते. तब्बल ९५ टक्के शिक्षक पात्रता परीक्षेत अनुत्तीर्ण ठरले होते. त्यामुळे राज्यातील शिक्षक महाविद्यालय आणि त्यातून उत्तीर्ण झालेल्या डी.एड. , बी. एड. धारक पदवीधरांच्या गुणवत्तेचे वाभाडे निघाले होते. यंदाची टीईटी परीक्षा १४ डिसेंबर रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात दुस-या टीईटीला गेल्या वर्षी नापास झालेले आणि यंदा डी. एड.,बी. एड. पदवी प्राप्त केलेल्या सुमारे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे अपेक्षित होते. परंतु अल्प निकालाच्या धसक्याने लाखो शिक्षक उमेदवारांनी या परीक्षेला सामोरे जाण्याचे टाळल्याचे दिसून आले.

पहिल्या टीईटीच्या परीक्षेत अधिकाधिक उमेदवार उत्तीर्ण व्हावेत यासाठी ६० टक्के गुण मिळाले तरी उमेदवारांना उत्तीर्ण ठरविण्याची संधी दिली होती. तरीही पहिल्या परीक्षेत डी. एड.,बी. एड. पात्रता असलेल्या ९५ टक्क्यांहून अधिक शिक्षकांना ६० टक्के गुणही मिळवता आले नव्हते.

नेट, सेटच्या धर्तीवर परीक्षा
उच्च शिक्षणात गुणवत्ता वाढावी यासाठी सेट आणि नेट या पात्रता परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाने सुरू केल्या. त्याच धर्तीवर शालेय शिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा शोध घेण्यासाठी टीईटी परीक्षा राज्यात २०१३ पासून घेण्यात येते. मात्र, पहिली परीक्षा ढिसाळ नियोजन आणि अल्प निकालामुळे वादात सापडली होती. आता दुस-या परीक्षेकडे शिक्षक उमेदवारांनी पाठ फ‍िरवली आहे. त्यामुळे परीक्षा होण्यापूर्वीच यंदाची टीईटी वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे टीईटीचे नियोजन करणा-या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेपुढे पेच निर्माण झाला आहे.