आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teachers Salary Will Be Deposited In Bank Account On 1st Day Of Month

ऑक्टोबरपासून शिक्षकांचा पगार एक तारखेला होणार जमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील 33 जिल्ह्यांतील अनुदानित संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतरांचा पगार ऑक्टोबर महिन्यापासून 1 तारखेला बँक खात्यात जमा होईल, अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी सोमवारी केली. नागो गाणार, अपूर्व हिरे, भगवान साळुंखे आदी सदस्यांनी याबाबत विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
3 ऑगस्ट 2012 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन 1 तारखेला अदा करण्याचे आदेश आहेत. तेव्हापासून 11 जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत तर 12 जिल्ह्यात जिल्हा बँकांमार्फत 1 तारखेला वेतन प्राप्त होत आहे. मात्र उरलेल्या जिल्ह्यांत ‘कोअर बँकिंग’ सेवा उपलब्ध नाही. तेथे मात्र वेळेत पगार शक्य झाला नसल्याचे फौजिया खान यांनी सांगितले.

कोअर बँकिंगच्या सक्षमीकरणासाठी ‘नाबार्ड’ एक प्रकल्प राबवत आहे. 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील कोअर बँकिंगचा प्रश्न मार्गी लागेल. त्यानंतर ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतरांचा पगार 1 तारखेला करण्यात काहीही अडचण येणार नाही. वेतन 1 तारखेला वेतन मिळण्याकरिता शालार्थ ही संगणक प्रणाली विकसित करण्यात येत असल्याचे खान यांनी सांगितले.

अनेक जिल्हा बँकांना रिझर्व्ह बँकेचा परवाना नाही, त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांतच पगार जमा करावा, अशी मागणी विनोद तावडे यांनी केली. तर जिल्हा बँकांनाच प्राधान्य द्यावे, असे शेकाप आमदार जयंत पाटील म्हणाले.
आजचा दिवस शिक्षकांचा
आज गुरुपौर्णिमा आहे. तारांकित प्रश्नातील पहिल्या 11 प्रश्नांपैकी 9 प्रश्न शिक्षकांशी संबंधित आहेत. त्यामुळे आज शिक्षक आमदरांना संधी देऊया, असे सांगत विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी कपिल पाटील, भगवान साळुंखे, विक्रम काळे, नागो गाणार, रामनाथ मोते यांना संधी दिली.


गुरुपौर्णिमेला गुरू कोपले
अंशत: अनुदान असणार्‍या 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांनाही जुनी निवृत्ती योजना लागू करावी या मागणीस फौजिया खान यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे शासनाचा निषेध करत विक्रम काळे, भगवान साळुंखे, रामनाथ मोते, नागो गाणार, कपिल पाटील या शिक्षक आमदारांनी सभात्याग केला.