आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teachers Withdraw Its Boycott On Twelth Examination After School Minister Discussion

बारावीचे विघ्न दूर; शिक्षणमंत्र्यांशी चर्चेनंतर शिक्षकांनी घेतली माघार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीने दहावी, बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्याचा मंगळवारी निर्णय घेतला. बुधवारी होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिल्यानंतर व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे संघटनांनी जाहीर केले.
राज्यात बारावीच्या परीक्षेला यंदा 15 लाख परीक्षार्थी आहेत. सहा फेब्रुवारीपासून बारावीच्या प्रात्यक्षिक, तर 20 पासून लेखी परीक्षा सुरू होत आहेत. आपल्या प्रलंबित मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी शिक्षकांनी या परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक संघ महामंडळ, विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षकेतर समन्वय समितीच्या मुख्य पदाधिका-यांनी मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा
यांची मुंबईतील बालभवन येथील कार्यालयात भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती दर्डा यांनी या वेळी केली. तसेच राज्यातील कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील ‘कायम’ शब्द मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत काढून टाकण्याचे आश्वासन दर्डा यांनी दिल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले.
शिक्षणमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत दहावी-बारावी परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज, सचिव अरुण थोरात आणि सुभाष माने यांनी जाहीर केले. मुल्यांकनास पात्र ठरलेल्या विनाअनुदानित शाळांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून त्यास लवकरच मंजुरी मिळेल, अशी ग्वाही शिक्षण मंत्र्यांनी दिल्याचे रेडीज यांनी सांगितले.
काय आहेत मागण्या
* सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करावी
* 42 दिवसांची संपकालीन रजा पूर्ववत द्यावी
* कायम विनाअनुदानित रद्द करावे
* 2008-09 पासून प्रस्तावित पदांना मंजुरी द्यावी
* अंशत: अनुदानावरील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी
* विज्ञानासाठी दोन स्वतंत्र पेपर असावेत
* अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईईई रद्द करावी
* कनिष्ठ महाविद्यालयासाठी स्वतंत्र प्रशासन
* सेवानिवृत्तीचे वय 60 करावे
बोर्डातर्फे पर्यायांचा विचार
राज्यातील शिक्षक संघटनांनी ताठर भूमिका घेतल्यामुळे राज्यातील नऊ शिक्षण मंडळांच्या पदाधिका-यांची बैठक मंगळवारी पुण्यात शिक्षण आयुक्त एस. चोकलिंगम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. शिक्षकांनी बहिष्कार मागे न घेतल्यास परीक्षांसाठी पर्यायी व्यवस्था काय करता येईल, याविषयी बैठकीत चर्चा झाल्याचे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले.