आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद विसरून महाराष्ट्राबरोबर यापुढे चांगले संबंध राखणार- मुख्यमंत्री चंद्रशेखर राव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र राज्याशी तेलंगणा मैत्रीपूर्ण संबंध ठेवू इच्छित असून पाणीवाटपावरून आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांदरम्यान सुरू असलेल्या वादाची कोणतीही सावली आपल्या संबंधांवर पडणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली. प्राणहिता - चेवल्या धरणाची उंची कमी करण्याबाबत महाराष्ट्राने केलेल्या विनंतीची दखल घेऊन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही राव यांनी स्पष्ट केले.
दोन्ही राज्यांशी संबंधित असलेल्या काही प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजभवनात मंगळवारी मुंबईत भेट घेतली.

लंेडी आणि निम्न पैनगंगा या दोन आंतरराज्य प्रकल्पांमधील पाणीवाटप आणि प्राणहिता-चेवल्या या धरणाच्या उंचीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यादरम्यान झालेली चर्चा पूर्णत: यशस्वी झाली नसली तरी त्यातील काही मुद्द्यांवर दोन्ही राज्यांच्या प्रमुखांमध्ये एकमत झाले आहे. प्राणहिता- चेवल्या या धरणाची उंची १५२ मीटर ठेवल्यास महाराष्ट्रातील जवळपास सातशे एकर अतिरिक्त जमीन पाण्याखाली जात असल्याने या धरणाची उंची कमी करावी, अशी मागणी सातत्याने महाराष्ट्राकडून होत होती.
आजच्या बैठकीतही यावर चर्चा झाली असून महाराष्ट्र राज्याची भूमिका राव यांच्यासमोर मांडण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या दोन्ही राज्यांदरम्यान पाणीवाटपावरून कोणताही वाद नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, प्राणहिता-चेवल्या प्रकल्पाबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर मी अभ्यास करणार असून लवकरच याबाबत तोडगा काढला जाईल. यासाठी आपण स्वत: प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे राव म्हणाले. हा प्रश्न सामोपचाराने सुटावा यासाठी आम्ही दोन्ही राज्ये प्रयत्नशील असून पाणीवाटपावरून आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रादरम्यानच्या वादाचा इतिहास आम्हाला विसरायचा आहे.
शिवाय, अन्य प्रकल्पांच्या पाणीवाटपाबाबत दोन्ही राज्यांत कोणताही वाद नसल्याचे राव यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.

राज्यपालांचीही सदिच्छा भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचीही सदिच्छा भेट घेतली. राज्यपालांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, सकाळी चंद्रशेखर राव यांनी मुंबईतले सुप्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शनही घेतले.