आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेंडुलकरांनी लिहिले हाेतेे; मृत्यूनंतर पांचाळ यांनी काढलेली माझी छायाचित्रेच प्रकाशित करावीत’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार व छायाचित्रकार विठोबा पांचाळ (६७) यांचे मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बोरिवली येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुहासिनी, मुलगा हृषीकेश, मुलगी रेणुका असा परिवार आहे.  संसदेत बसवलेला कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचा पूर्णाकृती ब्राँझ  पुतळा व कोकणातील मालगुंड येथे केशवसुतांच्या स्मारकस्थळी असलेले स्टेनलेस स्टीलचे तुतारी शिल्प या त्यांच्या कलाकृती खूप वाखाणल्या गेल्या. प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांच्याशी विठोबा पांचाळ यांचा अपार स्नेह होता. पांचाळ यांनी काढलेली छायाचित्रे तेंडुलकरांना खूपच आवडली होती. त्यामुळे विजय तेंडुलकर यांनी आपल्या मृत्युपत्रात असे लिहून ठेवले होते की, ‘मी गेल्यानंतर जर माझी छायाचित्रे प्रकाशित करायची झाली तर त्यासाठी पांचाळ यांनी पूर्वी माझी जी छायाचित्रे काढलेली होती तीच देण्यात यावीत.’

पांचाळ यांचे जन्मगाव कोकणातील लांजा. पुढे त्यांची मुंबई हीच कर्मभूमी बनली. जर्मन रेमिडीज कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शिल्पकला, छायाचित्रकलेला संपूर्ण वेळ वाहून घेतले होते.  काॅ. श्रीपाद डांगे यांच्या त्यांनी बनवलेल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते संसदेत अनावरण झाले होते.    केशवसुतांच्या ‘एक तुतारी द्या मज आणुनी’ या कवितेवर आधारित पांचाळ यांनी बनवलेले स्टेनलेस स्टीलचे अनोखे तुतारी शिल्प अलीकडेच कोकणातील मालगुंड गावी केशवसुतांच्या स्मारकस्थळी बसवण्यात आले होते. हीच त्यांची शिल्पकलेतील अखेरची कलाकृती ठरली. लांजा येथील समाजसेवक नाना वंजारे तसेच कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या पत्नी डॉ. विनीता यांची शिल्पेही पांचाळ यांनी बनवली आहेत. 
 
महाराष्ट्र फाउंडेशनसाठी काम
विठोबा पांचाळ हे चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे होते. महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेसाठी त्यांनी सुमारे १५ वर्षे छायाचित्रणाचे  काम केले. फाउंडेशनच्या वतीने साहित्य, समाजसेवा क्षेत्रातील ज्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार जाहीर करण्यात येत त्या व्यक्तींची कलात्मक छायाचित्रे काढण्याचे काम पांचाळ  करीत असत. ‘फोटोग्राफी : यंत्र आणि तंत्र’ हे पुस्तकही त्यांनी छायाचित्रण प्रेमींसाठी लिहिले होते. ‘विठोबा पांचाळ यांच्या निधनाने एका प्रतिभावंत व नि:स्पृह शिल्पकाराला आपण सारे मुकलो आहोत,’ अशा शब्दांत प्रख्यात साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांच्यासह राज्यभरातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...