आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tension In Ajit Pawar Camp After Statement From Sharad Pawar

शरद पवारांच्या वक्तव्याने दादांचा गट अस्वस्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांना तुम्ही राजीनामा देणार का ? असे विचारले असता, राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. द्यायचा झालाच तर ज्या आमदारांनी मला विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडले त्यांच्याशी बोलून योग्य तो निर्णय घेईन, असे सांगितले होते. नेमक्या याच वक्तव्याला चाप लावणारे वक्तव्य शुक्रवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केल्याने अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अजित पवारांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असे सांगताना पवार यांनी राजीनामा घ्यायचा किंवा नाही, याचा निर्णय पक्ष घेईल, असे सूचक वक्तव्य केले. अजितदादांच्या कार्यशैलीमुळे काही जण नाराज होत असले तरी पक्षातील बहुतांश आमदार व अनेक कार्यकर्ते हे त्यांच्या इशा-यावरच चालणारे आहेत. त्यामुळेच आमदारांना
विचारून निर्णय घेईन, असे त्यांनी सांगितल्यावर काही आमदारांनी अजित पवार यांच्या बाजूने सह्या गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती.

काही महिन्यांपूर्वी अजितदादांनी राजीनामा दिल्यावरही पक्षाच्या सर्व मंत्र्यांवर आमदारांकडून दबाव आणून त्यांचेही राजीनामे घेण्यात आले होते. तेव्हाही शरद पवार यांच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. तेव्हा शरद पवार यांनी दिल्ली येथून इतर मंत्र्यांना राजीनामे देण्यास कुणी सांगितले, असे खडसावून विचारले होते.

सध्या अजित पवार यांच्या वक्तव्यावरून गोंधळ सुरू असताना त्यांनी माफी मागूनही प्रकरण संपत नव्हते. या मागे पक्षातीलच त्यांचे काही प्रतिस्पर्धी असल्याचे दादांच्या समर्थकांचे म्हणणे होते. त्यामुळेच सातारा येथे त्यांनी पक्षाचे आमदार आपल्या पाठीशी असल्याचेच अप्रत्यक्षपणे सुचवले होते. मात्र, शुक्रवारी अजित पवार यांना क्लीन चिट देतानाच शरद पवार यांनी त्यांनाही पक्षातील निर्णय आपल्याच मर्जीने होतात, हेदेखील सुचवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.