आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - 2008मधील अहमदाबाद आणि सुरत बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व इंडियन मुजाहिदीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा हस्तक अफझल उस्मानी याने शुक्रवारी भरदुपारी बंदोबस्त भेदून पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. या लाजिरवाण्या प्रकारामुळे जगभर ख्याती असलेल्या मुंबई पोलिसांची नाचक्की झाली. अतिरेक्यांचा कसून शोध सुरू असून महानगरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.
लघुशंकेचा बहाणा, पोलिस गाफील
उस्मानी याला इतर 23 आरोपींसह सुनावणीसाठी सत्र न्यायालयाच्या आवारातील विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यासाठी तळोजा कारागृहातून आणले होते. न्यायालयात पोहोचल्यानंतर लघुशंकेचा बहाणा करून त्याने पळ काढला. अहमदाबाद बॉम्बस्फोटाच्या खटल्यात त्याच्यावर आरोप निश्चित केले जाणार होते. न्यायाधीश ए. एल. पानसरे यांच्यासमोर ही सुनावणी होणार होती.
अटक वॉरंट काढले
न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर उस्मानी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्याच्याविरुद्ध तत्काळ अटक वॉरंट काढण्यात आले. या वेळी बॉम्बस्फोटाच्या खटल्यात जामीन मिळालेले चार आरोपीदेखील उस्मानीसोबत हजर होते. परंतु उस्मानीच्या पलायनानंतर न्यायालयाने पोलिसांच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढत या प्रकरणाची सुनावणी 25 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
दोन्ही ठिकाणी उस्मानीने स्वत: बॉम्ब पेरले
बॉम्बस्फोटांसाठी वापरण्यात आलेल्या चार कारच्या चोरीमध्ये उस्मानी याचा हात होता. याच कारने अहमदाबाद आणि सुरत येथे स्फोटके पोहोचवण्यात आली होती. यातही उस्मानीची महत्त्वाची भूमिका होती. याशिवाय प्रत्यक्ष बॉम्ब पेरल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादेत 70 मिनिटांत 21 स्फोट झाले. 56 लोक मारले गेले. सुरतमध्ये 28 ते 30 जुलैदरम्यान न फुटलेले 26 बॉम्ब व स्फोटके तयार करण्याचे साहित्य असलेल्या दोन कारही जप्त करण्यात आल्या होत्या. नंतर मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशात उस्मानीला पकडले. आयएमचा प्रमुख यासीन भटकळचा तो विश्वासू मानला जातो.
चौकशीचे आदेश
* उस्मानी पळाला कसा, याच्या चौकशीसाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले आहे.
* मुंबई पोलिसांच्या सर्व 12 विभागांत खास पोलिस पथके स्थापन करण्यात आली असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
* हॉटेल्स, टॅक्सी, बसस्टँड, रेल्वेस्टेशनवर पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.
* सर्व पोलिस ठाण्यांना उस्मानीचे छायाचित्र पाठवण्यात आले असून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
असा होता बंदोबस्त...
*अहमदाबाद आणि सुरतमधील बॉम्बस्फोट प्रकरणी खटल्याच्या सुनावणीसाठी शुक्रवारी 23 आरोपींना न्यायालयात आणण्यात आले होते.
* या आरोपींसोबत फक्त 10 पोलिस. दुपारी दीडच्या सुमारास आरोपींना कोर्टात आणले.
* न्यायाधीशांनी 2.40 वाजता सर्व आरोपींना पुन्हा सादर करण्याचे आदेश दिले. कोर्ट नंबर 35 बाहेर उस्मानी व पोलिस उभे होते.
* लघुशंकेचा बहाणा करून उस्मानी पळाला आणि पोलिसांची पाचावर धारण बसली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.