आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Organization Will Attack On Mumbai During Ganesh Festivel

दहशतवाद्यांकडून गणेशोत्सवात मुंबईत घातपाताची शक्‍यता, राज्‍यातही अलर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख यासीन भटकळ व लष्कर- ए- तोयबाचा ‘बॉम्बर’ अब्दुल करीम टुंडा यांच्या अटकेचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटना ऐन गणेशोत्सवात मुंबईत घातपात घडवण्याची भीती गुप्तहेर संघटनांनी (आयबी) व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे, अशी माहिती एका अधिका-याने दिली. याशिवाय नागपूर, पुणे, औरंगाबादसह सर्व प्रमुख शहरांमध्‍ये कडेकोट पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. सर्व संवेदनशील भागात गस्‍त वाढविण्‍यात आली असून प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात आहेत.


‘आयबी’ने दिलेल्या इशा-याचे पत्र गेल्याच आठवड्यात मुंबई पोलिसांना प्राप्त झाले असून त्यानुसार सर्व पातळीवर खबरदारी घेतली जात असल्याचेही संबंधित अधिका-याने सांगितले.


बॉम्ब बनवण्यात माहिर असलेला ‘तोयबा’चा अतिरेकी टुंडा, जर्मन बेकरीसह अनेक बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असलेला यासीन भटकळ व त्याचा साथीदार अब्दुल्ला अख्तर ऊर्फ असादुल्ला यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. या म्होरक्यांच्योअटकेमुळे दहशतवादी संघटनांचे धाबे दणाणले असून, त्याचा बदला घेण्यासाठी ते गणेशोत्सवाच्या काळात घातपात घडवून आणण्याची भीती गुप्तहेर संघटनांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयबी’ने पोलिसांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.


या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारीच यासीन भटकळचे साथीदार व वॉँटेड आरोपी तहसीन अख्तर वासीम शेख ऊर्फ मोनू व वकास ऊर्फ अहमद यांची नव्याने रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या आरोपींना 13 जुलै रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटासह राज्यातील इतर घातपाती कारवायात सहभाग असल्याचा एटीएसचा दावा आहे. या दोघांवर प्रत्येकी 10 लाखांचे इनामही जाहीर करण्यात आले आहेत.


24 तास हेल्पलाइन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 24 तास सुरू असणारी एक हेल्पलाइन तयार केली आहे. कुठल्याही व्यक्ती किंवा वस्तूबाबत संशय आल्यास 022- 22633333 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी जनतेला केले आहे. मुंबईत सुमारे 6 हजार सार्वजनिक गणेश मंडळे असून त्यात पोलिसांच्या दृष्टीने 52 संवेदनशील मंडळांचा समावेश आहे. या ठिकाणी गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने दिली.