आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Usmani Free, Special Compaign Of Police Failed

अतिरेकी उस्मानी फरारच; विशेष मोहीम राबवूनही पोलिसांचे हात रिकामेच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अहमदाबाद आणि सुरत बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व इंडियन मुजाहिदीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी अफझल उस्मानीने मुंबई पोलिसांना घाम फोडला आहे. शुक्रवारी भरकोर्टातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन पसार झालेल्या या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले, मात्र अद्याप तो हाती लागलेला नाही. त्यामुळे उस्मानीची माहिती देणार्‍या व्यक्तीला आता इनाम जाहीर करण्याचा पोलिस विचार करत आहेत.

उस्मानी पळून गेल्याने मुंबई पोलिसांची नाचक्की झाली. त्याचा शोध घेण्यासाठी राज्यासह देशभरात युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे. मात्र, तीन दिवस उलटले तरी अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. उस्मानी नेपाळमध्ये पळून जाण्याची शक्यता असल्याने बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम पोलिसांना सतर्क करण्यात आले असून त्याचे छायाचित्रही सर्व ठाण्यात देण्यात आले आहे. उस्मानीचे बिहार आणि उत्तर प्रदेश येथे चांगले नेटवर्क असल्याने पोलिसांचे एक पथक दोन्ही राज्यांत गेले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली.


लघुशंकेचा बहाणा, पोलिस गाफील
भावाच्या मित्राकडून घेतले 700 रुपये
न्यायालयाच्या आवारातून फरार झाल्यानंतर उस्मानीने मुंबईतील आपल्या भावाच्या एका मित्राची भेट घेतली. यानंतर त्याच्याकडून 700 रुपये घेऊन पोबारा केला. ज्या व्यक्तीने उस्मानीला पैसे दिले त्याची पोलिस कसून चौकशी करत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

स्फोट प्रकरणातील उस्मानी व इतर 23 आरोपींना शुक्रवारी तळोजा कारागृहातून सत्र न्यायालयाच्या आवारातील विशेष मोक्का न्यायालयात सुनावणीस हजर करण्यासाठी आणले होते. न्यायालयात पोहोचल्यानंतर लघुशंकेचा बहाणा करून त्याने पळ काढला. याच दिवशी अहमदाबाद बॉम्बस्फोटाच्या खटल्यात त्याच्यावर आरोप निश्चित केले जाणार होते. या प्रकरणी दोन पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

पुणे, औरंगाबाद पोलिसांनाही अलर्ट
उस्मानी फरार झाल्यानंतर त्याच्या प्रकरणाच्या माहितीसह नातेवाईक, मित्र आणि शेजार्‍यांबाबत औरंगाबाद, पुणे, ठाणे आणि वाशी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तसेच शेजारी राज्य असलेल्या आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांनाही त्यांची माहिती देण्यात आली आहे.