आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Test For BJP In Rain Session, Answering Opposition Allegation

पावसाळी अधिवेशनात भाजपचा लागणार कस, आरोपांना उत्तर देण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. दोन महिन्यांपूर्वी विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विशेष मुद्देच नव्हते. परंतु दोन महिन्यात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना आयते मुद्दे दिल्याने अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर तुटून पडण्याची पूर्ण तयारी केली आहे. विरोधकांची आक्रमक व्यूहरचना पाहून भाजपानेही कंबर कसली आहे. दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने मात्र शांत राहून भाजपालाच विरोधकांच्या तोंडी देण्याची योजना आखली आहे.

या अधिवेशनात कैद्यांचे तुरुंगातून पळून जाणे हा अत्यंत महत्वाचा विषय घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांना घेरण्याची निती तयार करण्यात येत होती. गृह विभाग मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार होती. मात्र, आता हा विषय मागे पडल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्याने दिली.

पंकजा मुंडे यांचे चिक्की प्रकरण, विनोद तावडे यांची बोगस पदवी आणि शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरवण्याबाबत झालेला घोटाळा या दोन मुद्यांवर आम्ही सरकारला घेरणार आहोत. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि गणेशोत्सव मंडप या दोन मुद्यांवरही सरकारला सळो की पळो करून सोडले जाणार आहे. स्वच्छ प्रतिमा असलेल्या भाजपाचे हे घोटाळे जनतेचे कोट्यावधी रुपये पाण्यात घालवणारे असल्याने आम्ही सरकारला सहजासहजी सोडणार नाही, असेही या नेत्याने सांगितले.

सेना बाळगणार मौन
दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री मात्र अत्यंत आनंदी आहेत. शिवसेनेच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नसल्याने विरोधक त्यांच्यावर तुटून पडण्याची शक्यता कमीच आहे. सत्तेत सहभागी असल्याने भाजप मंत्र्यांचा बचाव शिवसेनेचे मंत्री करतील, असे बोलले जात होते. मात्र, शिवसेनेने गप्प राहण्याचे ठरवले असल्याची माहिती सेनेतील सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या मंत्र्यांवर सभागृहात आरोप होत असताना काहीही न बोलता शिवसेनेचे मंत्री केवळ पाहत राहणार आहेत. एकूणच स्वबळावर सत्तेत आलेल्या भाजपसाठी सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

भाजपने केली तयारी
भाजपनेही विरोधकांची धार बोथट करण्यासाठी आघाडी सरकारच्या काळातील दर करारानुसार केलेल्या खरेदीचा अहवाल तयार केला असून या अहवालाच्या आधारावरच विरोधकांना गप्प केले जाणार आहे. भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. अधिवेशनाची आम्हाला काहीही चिंता नाही. आम्ही अत्यंत चांगले काम केलेले आहे आणि करत आहोत. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने त्यांनी खोटे आरोप केले आहेत. मात्र, आम्ही या आरोपांना पुरेपूर उत्तर देणार आहोत.