आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात भाजपसमोर पेच!गायब झालेले मिलिंद पाटणकर सापडले कर्नाटकात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उपमहापौरपदाचा राजीनामा देऊन गायब झालेल्या मिलिंद पाटणकर यांच्यामुळे ठाण्यात भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पाटणकर यांचा आता राजीनामा हवाच, अशी ठाम भूमिका भाजपच्या सात नगरसेवकांनी घेतली आहे. मात्र, मी बंडखोरी करण्यासाठी पैसे घेतले नाहीत. त्यामुळे मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका पाटणकर यांनी घेतली आहे. आपल्याच पक्षातील नगरसेवकांच्या या दोन टोकांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यामधून कसे मार्ग काढतात, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
परिवहन समितीच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी पाटणकर यांनी पुढाकार घेतल्याने महायुतीचा अधिकृत उमेदवार पडला आणि भाजपसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाटणकर यांना जोरदार चोप दिला. यानंतर पाटणकर गायब झाल्याने ठाण्यासह राज्यभर भाजपच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. पाटणकर कुठे गेले हे मंगळवारपर्यंत कोणालाच
माहित नव्हते; पण बुधवारी ते कर्नाटकात असल्याचे समजले. दोन ते चार दिवसांत आपण मुंबईत येऊ, असे त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.
पाटणकर हे भाजपचे ठाणे शहराध्यक्षही आहेत. मात्र, त्यांना शहरात सोडाच, पण महापालिकेतही भाजपला संघटना म्हणून एकत्र बांधता आलेले नाही. पाटणकरांसह भाजपचे ठाण्यात आठ नगरसेवक असून 7 विरूद्ध 1 असे हे भांडण आहे. भाजपच्या सात नगरसेवकांच्या मते पाटणकरांवर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही सर्वजण राजीनामे देतो.
शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस यांच्या तुलनेत ठाण्यात भाजपची परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यातच त्यांच्याच पक्षातील ही भांडणे पाहून भाजपा पक्षश्रेष्ठींच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मते हा तिढा लवकरच सोडवला जाईल. पाटणकर ठाण्यात परतल्यानंतर हा गुंता सुटेल, असे बोलले जाते. मात्र, त्यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा युतीसाठी फायदेशीर ठरणार नाही, हे निश्चित असल्याने पाटणकर तसेच इतर नगरसेवकांच्या नाकदुर्‍या काढण्यावाचून पर्याय उरणार नाही.
आघाडीच्या भांडणामुळे युतीला जीवदान
महायुती 65 विरुद्ध आघाडी 65 अशी ठाणे महापालिकेची नगरसेवकांची स्थिती आहे. यामुळे महायुतीमधील एक नगरसेवक
बाहेर पडला तरी काँगे्रस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष अशी आघाडी सत्तेवर येईल, असे दिसते. मात्र, प्रत्यक्षात आघाडीतील एकाचे दुसर्‍याशी पटत नाही. काँगे्रस, मनसे तसेच अपक्षांनी बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने ही आघाडी कमकुवत झाली आहे. परिणामी, आघाडीचे भांडणे म्हणजे युतीचे जीवदान अशी स्थिती आहे.