मुंबई- महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्समधील मराठी चित्रपटांना प्राइम टाइम देण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका करणा-या स्तंभलेखिका शोभा डे यांना शिवसेनेने झणझणीत शिव वडापावसह दहीमिसळ भेट दिली. शिवसैनिकांनी त्यांच्या कफ परेड येथील घरावर मोर्चा काढून ‘शोभा आण्टी हाय हाय, शिववडापाव पाहिजे काय’ अशा जोरदार घोषणा दिल्या. शिवसेनेने शोभा डे यांना भेट दिलेल्या शिव वडापाव व दहीमिसळबाबत त्यांनी टि्वट केले. धन्यवाद, शिवसेना, फारच चविष्ठ! असे डे यांनी टि्वट केले. शोभा डे यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी शिवसैनिकांनी केली. मात्र, डे यांनी शिवसेनेलाच सुनावले. सामनात एका महिलेविषयी वापरलेली भाषा अशोभनीय आहे असे शोभा डे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे मुंबईतील स्थानिक नेते पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी गुरुवारी शोभा डे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘मुंबई मराठी माणसांची, नाही कोणाच्या बापाची’ अशा जोरदार घोषणा त्यांनी दिल्या. सोबत शिववडापाव आणि दहीमिसळही त्यांनी आणली होती. घोषणाबाजी ऐकून शोभा डे खाली आल्या पण शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहून त्यांनी पोलिसांना कळवले. डे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 18 शिवसैनिकांना अटक केली व नंतर त्यांना सोडून देण्यात आले. डे यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.
पुढे वाचा, मराठी चित्रपटांना मिळणार हवी ती वेळ...