आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकत्रित राहायचे की नाही हे सेना- भाजपने ठरवावे, अशोक चव्हाणांचे वक्तव्य; नव्या समीकरणांची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘राज्यात शिवसेना- भाजपची युती आहे, त्यांचा अगोदर निर्णय होऊ द्या. मग काय ते बघू. सध्या आम्ही त्रयस्थाच्या भूमिकेत आहोत’, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमधील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी गांधी भवन येथे झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. मुंबईत एकीकडे सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची जुळवाजुळव सुरू असताना काँग्रेसच्या या भूमिकेमुळे पुन्हा राजकीय वातावरणात उलटसुलट चर्चेला उत आला आहे.  
  
राज्यभरातील निवडणूक निकालानंतर काँग्रेसची चिंतन बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. काँग्रेसच्या राज्यभरातील कामगिरीचा आढावा या वेळी घेण्यात आला. त्याचबरोबर १३ जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होण्याच्या पर्यायावरही चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, ‘राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती आहे. मुंबई महापालिकेच्या ताज्या निकालानंतरही आम्ही त्रयस्थाच्या भूमिकेत आहोत. त्यामुळे आमच्या निर्णयाऐवजी अाधी त्यांना एकत्र राहायचे आहे की नाही, हे अगाेदर  शिवसेनेने ठरवावे.’ चव्हाणांच्या या संदिग्ध वक्तव्यामुळे मुंबईत नव्याच राजकीय चर्चेला उत आला आहे.  
 
ही तर काँग्रेसची ‘गुगली’ 
अशाेक चव्हाण यांनी शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जरी राजकीय चर्चेला उधाण आले असले तरीही राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार शिवसेना आणि भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करण्यासाठी काँग्रेसने टाकलेला हा ‘गुगली’ असावा. 
 
सध्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पाच टप्प्यांचे मतदान झाले अाहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसने शिवसेनेला मदत करण्याची भूमिका घेतल्यास त्या मुद्द्याचे भाजप उत्तर प्रदेशातील उर्वरित निवडणुकीत भांडवल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेला थेट पाठिंबा देण्याबाबत काेणताही निर्णय घेण्याची शक्यता नाही.   
 
१३ जिल्हा परिषदांत राष्ट्रवादीशी अाघाडी
राज्यातील नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला असला तरीही जवळपास १३ जिल्हा परिषदांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आघाडीचा अध्यक्ष होऊ शकेल. तशा आशयाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांना दिला. त्या प्रस्तावावर शुक्रवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून काँग्रेसही या प्रस्तावास अनुकूल असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...