आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चा: राणेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ देणार मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा आरक्षणासह इतर काही मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला मूक मोर्चा बुधवारी मुंबईत धडकणार असून या मोर्चाला २० ते २५ लाख लोक येतील. मोर्चानंतर माझ्यासह एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देईल, अशी माहिती काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिली. तसेच हा शेवटचा मोर्चा नसून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राणे म्हणाले, मराठा मोर्चा बुधवारी सकाळी  ११ वाजता जिजामाता उद्यानाजवळून निघणार असून जेजे फ्लायओव्हरवरून आझाद मैदानावर येईल. मोर्चात सहभागी झालेले लोक त्या ठिकाणी थांबतील. मूक मोर्चा असल्याने भाषणे होणार नाहीत. त्या ठिकाणाहून एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यास विधिमंडळात येईल. त्यांना निवेदन दिले जाईल. शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी निवेदनातील विषयांबाबत चर्चा करील आणि मराठा आरक्षण व अन्य मुद्द्यांबद्दल शासनाचे मत मुख्यमंत्री व्यक्त करतील. काही निर्णायक गोष्टी होतील. ज्या मुख्यमंत्र्यांनीच शिष्टमंडळाला सांगाव्यात, असे आम्ही सांगितले आहे. त्यानंतर मोर्चा संपेल. 

मोर्चासाठी मंगळवारपासून मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते मुंबईत येऊन पोहोचले आहेत. मोर्चाबाबत मोठा उत्साह असून या मोर्चाला गालबोट लागणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. सरकारचेही मोर्चाला चांगले सहकार्य लाभले आहे, असेही राणे म्हणाले. आरक्षणाचा निर्णय राज्याच्या अखत्यारीतलाच आहे. कोर्टाने सांगितलेल्या काही मुद्द्यांवर विचार झाला तर सरकार हा निर्णय घेऊ शकेल. सरकारकडे मागायला जाताना नाराजी व्यक्त करणार नाही. लोकशाहीत मोर्चे कधी संपत नाहीत, असेही ते  म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...